३५ दिवसांत राज्यात ६,१११ नवे क्षयरुग्ण १०० दिवसांच्या मोहिमेत धक्कादायक वास्तव समोर; लातूर, विदर्भ आणि अहमदनगरमध्ये चिंता वाढली

३५ दिवसांत राज्यात ६,१११ नवे क्षयरुग्ण
१०० दिवसांच्या मोहिमेत धक्कादायक वास्तव समोर; लातूर, विदर्भ आणि अहमदनगरमध्ये चिंता वाढली
Published on

३५ दिवसांत सहा हजार १११ नवे रुग्ण
११ हजार गावांवर क्षयाचा धोका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : केंद्र सरकारच्या १०० दिवसांच्या ‘टीबीमुक्त भारत’ अभियानाच्या पहिल्या ३५ दिवसांत महाराष्ट्रात सहा हजार १११ नवीन क्षयरोग रुग्णांची नोंद झाली असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित विश्लेषणातून राज्यातील ११ हजार ९१ गावे आणि शहरी प्रभागांना क्षयाचा उच्च धोका असलेले क्षेत्र म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी (ता. २४) विधानसभेत ही माहिती दिली.

डॉ. नितीन राऊत यांच्यासह डॉ. जितेंद्र आव्हाड, अमित देशमुख, सुनील राऊत आदी १२ आमदारांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना आबिटकर यांनी ही माहिती दिली. क्षयाचा वाढता प्रादुर्भाव, निदान सुविधा आणि मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सरकारने विधानसभेत सविस्तर माहिती दिली. केंद्र सरकारने विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विश्लेषण प्रणालीच्या आधारे महाराष्ट्रातील ११ हजार ९१ गावे आणि प्रभाग क्षय रोगाच्या दृष्टीने संवेदनशील असल्याचे ओळखण्यात आले आहे. ही गावे क्षयाचा उद्रेक झाल्यामुळे नव्हे, तर भविष्यात क्षयाचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असल्याने निवडण्यात आल्याचे राज्य क्षयरोग विभागाने स्पष्ट केले. ‘वाधवानी एआय’ने विकसित केलेल्या या मॉडेलमध्ये ३२ वेगवेगळ्या निर्देशकांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये पूर्वीचे क्षयरुग्ण, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती, स्वच्छतेची परिस्थिती, कुपोषण, लसीकरण स्थिती, साक्षरता, मधुमेह व उच्च रक्तदाब, तंबाखू व मद्यसेवन, लोकसंख्येची घनता, प्रदूषण, भौगोलिक व सामाजिक घटक यांचा समावेश आहे.

या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक उच्च जोखीम गावे
नागपूर : ४८२ गावे
यवतमाळ : ५३९ गावे
अमरावती : ५०४ गावे
नाशिक : ४८८ गावे
रायगड : ४८८ गावे

शहरी भागात अधिक धोका
शहरी भागात, विशेषतः दाट लोकवस्तीच्या झोपडपट्ट्यांमध्ये गर्दीमुळे क्षयाचा प्रसार अधिक होतो. ग्रामीण भागात कुपोषण, कमी प्रतिकारशक्ती, मधुमेह, एचआयव्ही आणि इतर सहव्याधी यामुळे क्षयाचा धोका वाढतो. मुंबईसारख्या शहरांमध्ये गर्दीच्या वस्त्यांमध्ये क्षयाचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.

...

लातूर आणि अहिल्यानगरच्या आकडेवारीत दुरुस्ती
विधानसभेतील प्रश्नामध्ये लातूर जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०२६ दरम्यान ७५८ नवीन क्षय रुग्ण आढळल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र सरकारने स्पष्ट केले, की या कालावधीत ७२९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, १,०२० रुग्ण उपचाराखाली आहेत. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात नऊ हजार ४०३ रुग्ण आणि २४७ मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.

राज्य सरकारच्या माहितीनुसार
२०२५मध्ये : ४,४९३ नवीन रुग्ण, ९२ मृत्यू
जानेवारी ते मे २०२६ : १,८४६ नवीन रुग्ण, १० मृत्यू अशी नोंद झाली आहे.

विदर्भ व आदिवासी भागांबाबत सरकारचे स्पष्टीकरण
विदर्भातील कापूस पट्टा आणि आदिवासी भागात कुपोषण व अस्वच्छतेमुळे क्षयाचे प्रमाण अधिक असल्याचा दावा सरकारने फेटाळून लावला आहे. राज्यातील कोणत्याही विशिष्ट भौगोलिक भागात असामान्य प्रमाणात क्षयाचा भार असल्याचे आढळले नसल्याचे सरकारने स्पष्ट केले. राज्य क्षयरोग विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये क्षयाचा प्रसार वेगवेगळ्या कारणांमुळे होतो.

क्षय निदान
११७ एआय-सक्षम हँडहेल्ड एक्स-रे यंत्रे, १७१ सीबी-नॅट यंत्रे, ७४६ ट्रूनॅट यंत्रे उपलब्ध असून, एकूण ९१७ आण्विक निदान यंत्रे कार्यरत असल्याची माहिती सरकारने दिली. उच्च जोखीम गावांमध्ये सक्रिय तपासणीसाठी हँडहेल्ड एक्स-रे यंत्रांचा वापर केला जात असून, केंद्र सरकारकडून टप्प्याटप्प्याने आणखी २२९ यंत्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

विशेष तपासणी मोहिमांवर भर
उच्च जोखीम गावांमध्ये १४ वर्षांवरील नागरिकांची तपासणी करण्यात येत असून, विशेषतः मधुमेहग्रस्त, एचआयव्ही बाधित, कर्करोगग्रस्त, प्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण, क्षयाची लक्षणे असलेले नागरिक यांची सक्रिय तपासणी केली जात आहे.

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सर्व क्षय रुग्णांना मोफत तपासण्या, मोफत औषधे, नियमित फॉलो-अप सेवा पुरविण्यात येत आहे. तसेच नि:क्षय पोषण योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना दरमहा १,००० रुपयांचे पोषण सहाय्य दिले जाते. सामाजिक संस्था व दात्यांच्या मदतीने अन्नधान्य किटचेही वितरण केले जात असल्याचे सरकारने स्पष्ट केले.

आरोग्य विभागाच्या मते, एआयआधारित जोखीम मूल्यांकनामुळे क्षयाचा प्रसार होण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये लवकर तपासणी, रुग्ण शोधमोहीम आणि तातडीने उपचार सुरू करणे शक्य होत आहे. त्यामुळे क्षयाचा प्रसार, मृत्यूदर आणि गंभीर परिणाम कमी करण्यास मदत होणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com