

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी भिवंडी तालुक्यातील आतकोली येथे देण्यात आलेल्या ३४ हेक्टर (सुमारे ८४ एकर) भूखंडावरच बेकायदा दगडखाणी सुरू असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात आला आहे. महापालिकेच्या मालकीच्या जागेत दगडाचे उत्खनन सुरू असताना घनकचरा विभागाने याकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल करीत या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
आतकोली येथील ३४ हेक्टर जमीन राज्य सरकारने २०२४ मध्ये ठाणे महापालिकेच्या ताब्यात दिली. या ठिकाणी महापालिकेच्या घनकचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्याच्या प्रकल्पाची पूर्वतयारी सुरू आहे. मात्र, या जागेवर पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात दगडाचे उत्खनन सुरू असल्याचे आढळल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला. गेल्या काही महिन्यांत सुमारे ३० फूट खोदकाम करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या उत्खननामुळे सरकारचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाल्याचा दावा त्यांनी केला.
पोलिसी तक्रारीत गडबड
महापालिकेने या ठिकाणी बेकायदा दगडखाणी सुरू असल्याबाबत १० जानेवारी २०२५ रोजी पडघा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, संबंधित विभागाने जिल्हा प्रशासनाकडे कारवाईसाठी पाठपुरावा करण्याऐवजी पोलिसांत तक्रार करून प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न केला का, असा प्रश्न प्रधान यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या ताब्यातील जागेत दगडखाण सुरू असताना जबाबदार व्यक्तींवर कारवाई का झाली नाही, अशी विचारणाही त्यांनी केली.
गुरचरणाच्या भूखंडांवरही उत्खनन
आतकोली परिसरातील गुरचरण महाराष्ट्र सरकारच्या विविध भूखंडांवरही बेकायदा दगडखाणी सुरू असल्याचा दावा प्रधान यांनी केला. या ठिकाणाहून दररोज मोठ्या प्रमाणात दगड काढला जात असून परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी तो विकला जात असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही दुर्लक्ष होत असल्याचेही त्यांनी म्हटले.
रिकामे डंपर परत का?
पाहणीदरम्यान कचरा वाहून आणणारे डंपर आतकोलीच्या दिशेने येत असताना काही रिकामे डंपरही याच परिसरातून परत जात असल्याचे दिसल्याचे प्रधान यांनी सांगितले. पाहणी सुरू असताना एका व्यक्तीने या डंपरचालकांना हातवारे करून परत पाठविल्याचा दावाही त्यांनी केला. हा प्रकार संशयास्पद असून संबंधित व्यक्ती कोण होती, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
३२९ कोटींच्या कंत्राटावरही प्रश्नचिन्ह
आतकोली येथील एका ठिकाणी खासगी कंपनीचा फलक आढळला. महापालिकेने कार्यादेशानुसार कंपनीला ३२९.४५ कोटींचे कंत्राट दिले असून, दररोज ६०० ते ८०० टन कचऱ्याचे विलगीकरण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीवेळी कचरा विलगीकरणाची मानवी किंवा यांत्रिक व्यवस्था दिसली नाही. कचऱ्यावर केवळ माती टाकली जात असल्याचा दावा प्रधान यांनी केला.
एसआयटी चौकशीची मागणी
दगडचोरी, कचरा व्यवस्थापन आणि कंत्राटाची अंमलबजावणी या सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह संबंधित कंपनीचीही एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रधान यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.