

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण
‘आरोप करण्यापेक्षा पोलिसांना पुरावे द्या’
ज्योती वाघमारे यांचा विरोधकांना टोला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी शनिवारी (ता. ३) ठाण्यात पत्रकार परिषद घेत विरोधकांवर टीका केली. महिलांचे नेतृत्व करणाऱ्या मीनाक्षी शिंदे यांना खुनाच्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र पोलिस या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून हत्येमागील सत्य बाहेर आणतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पूर्णेकर हत्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि तपासात कोणाचीही बाजू घेतली जाऊ नये, अशी भूमिका वाघमारे यांनी मांडली. अशा घटना घडल्यानंतर मृताच्या कुटुंबीयांना आधार देणे गरजेचे असते; मात्र येथे मृत्यूचे राजकारण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार सुरू आहे. हा महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली. मीनाक्षी शिंदे यांनी माध्यमांसमोर येऊन पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्यापेक्षा विरोधकांनी पोलिसांना ठोस पुरावे द्यावेत, असे आवाहन वाघमारे यांनी केले. ‘‘पूर्वी औरंगजेबाच्या सैन्याला पाणी पितानाही संताजी-धनाजी दिसायचे; तसे आता काहींना सर्वत्र एकनाथ शिंदेच दिसतात,’’ असा टोला त्यांनी लगावला.
---
दिशा सालियनप्रकरणी फडणवीस यांची भेट घेणार
‘‘आमच्या पक्षातील महिलेला बदनाम करू नका,’’ असे आवाहन करीत वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ‘‘यापूर्वी अनेकांचे मुडदे पडले, तेव्हा उद्धव ठाकरे कधी बाहेर पडले का?’’ असा सवालही त्यांनी केला. दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करीत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी आरोप केले. एफआयआरमध्ये नावे असल्याचा दावा करीत संबंधितांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.