‘समृद्धी’वर बेकायदा वाहनांना प्रवेश कसा?

‘समृद्धी’वर बेकायदा वाहनांना प्रवेश कसा?
Published on: 

‘समृद्धी’वर बेकायदा वाहनांना प्रवेश कसा?
वाहतूकतज्ज्ञांचा सवाल; एमएसआरडीसीसह आरटीओच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : समृद्धी महामार्गावरून दुर्गादेवीची मूर्ती असलेली ट्राॅली ओढत धीम्या गतीने जाणाऱ्या पिकअप व्हॅनला ट्रकने धडक दिल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. त्यामुळे हळहळ व्यक्त होत असली तरी प्रवेश नियंत्रित असलेल्या या महामार्गावर मूर्ती असलेल्या ट्राॅलीला प्रवेश कुणी दिला, ज्या मार्गावर ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने वाहने धावतात तेथे १० ते १५ किमी वेगाने चालणारी अशी अनधिकृत वाहने येतातच कशी; एमएसआरडीसी, महामार्ग पोलिस, आरटीओ विभाग काय करीत आहेत, असे संतप्त सवाल वाहतूकतज्ञांकडून विचारले जात आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दुचाकी, ट्रॅक्टर, बैलगाडी अशा कमी वेगाने धावणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जात नाही; मात्र शेगाव येथून पिकअप व्हॅनला मागे लोखंडी ट्राॅली जोडून वर्ध्याच्या दिशेने दुर्गादेवीची मूर्ती घेऊन निघालेल्या कार्यकर्त्यांनी अकोला येथून समृद्धी महामार्गावर प्रवेश घेतला होता. हे वाहन आणि ट्राॅली ताशी १० ते १५ किलोमीटर वेगाने चालन असल्याने त्यांना समृद्धीवर प्रवेश देणे बेकायदा होते. तरीही येथे कार्यरत असलेल्या टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवेश दिला कसा? महामार्ग पोलिसांनी त्यांना अटकाव का केला नाही? प्रशासनाने आपली जबाबदारी चोखपणे पार न पाडल्याने हा अपघात घडल्‍याचे वाहतूकतज्ज्ञ गाॅडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले. दरम्यान, या वाहनाला अकोला येथील टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी प्रवेश नाकारला होता; मात्र काही राजकीय नेत्यांनी कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्याने प्रवेश द्यावा लागला. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणी वाहतूकतज्ज्ञांसह स्थानिकांकडून होत आहे. तसेच भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

समृद्धीवर वाऱ्याच्या वेगाने वाहने धावत असल्याने येथे प्रवेश नियंत्रित असतो. प्रवेश प्रतिबंधित असलेल्या वाहनांना इंटरचेंजच्या ठिकाणीच रोखायला हवे; मात्र महामार्ग पोलिस, आरटीओ, एमएसआरडीसी कोणीच आपली जबाबदारी पार पाडत नसल्याने जीवघेणे अपघात घडत आहेत, ही शोकांतिका आहे.
- ॲड. गाॅडफ्रे पिमेंटा, वाहतूकतज्ज्ञ

समृद्धीसह मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहनधारक टोल भरून प्रवास करतात. मात्र अशा मार्गावर अनधिकृत वाहने आल्याने प्राणांतिक अपघात होणार असेल, तर त्यासाठी संबंधित यंत्रणांना जबाबदार धरून कारवाई करायला हवी. अनधिकृत वाहन एक्स्प्रेस वेवर कसे आले, यापेक्षा त्याला प्रवेश कोणी दिला याचा शोध घ्यायला हवा.
- अशोक दातार, वाहतूकतज्ज्ञ

अमरावती येथे अपघातग्रस्त झालेल्या वाहनाला समृद्धीवर प्रवेश कसा मिळाला, अपघात कसा झाला, याबाबतचा अहवाल आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.
- डाॅ. अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com