

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पावसाळ्यात डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिसच्या संशयित रुग्णांच्या मोठ्या प्रमाणात रॅपिड चाचण्या होत असल्या, तरी आजाराची खात्री करण्यासाठी केल्या जाणाऱ्या एलिसा तपासण्यांची संख्या अत्यल्प असल्याचे व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या ‘आरटीआय’मधून समोर आले आहे. २०२२ पासून ऑगस्ट २०२६ पर्यंत डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिसच्या हजारो रॅपिड चाचण्या झाल्या; मात्र एलिसा तपासणीद्वारे आजाराची खात्री झालेल्या रुग्णांची संख्या अनेक वर्षांत शून्य किंवा अत्यल्प आहे.
आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मागविलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये रुग्णालयात डेंग्यूच्या ११ हजार ६२८ रॅपिड चाचण्या करण्यात आल्या. मात्र, एलिसा तपासणीद्वारे एकाही रुग्णाच्या आजाराची खात्री झाल्याची नोंद नाही. २०२३मध्ये १३ हजार ७२३ रॅपिड चाचण्यांपैकी केवळ १० रुग्णांच्या आजाराची एलिसाद्वारे खात्री झाली. २०२४ मध्ये १४ हजार २२७ रॅपिड चाचण्या झाल्या, तर केवळ एका रुग्णाची एलिसा तपासणीद्वारे खात्री झाली. २०२५मध्ये डेंग्यूच्या १२ हजार ६८४ रॅपिड चाचण्या झाल्या; मात्र एलिसा तपासणीद्वारे आजाराची खात्री झालेल्या रुग्णांची संख्या पुन्हा शून्य आहे. २०२६मध्ये ३१ ऑगस्टपर्यंत आठ हजार ८०९ रॅपिड चाचण्या झाल्या असून, एलिसा तपासणीद्वारे आजाराची खात्री झाल्याची नोंद नाही.
‘लेप्टो’च्या तपासण्यांमध्येही तफावत
लेप्टोस्पायरोसिसच्या बाबतीतही अशीच स्थिती दिसून येते. २०२२ मध्ये १० हजार ४८२ आणि २०२३ मध्ये १२ हजार ६४५ रॅपिड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी अनुक्रमे एकाही आणि दोन रुग्णांच्या आजाराची एलिसा तपासणीद्वारे खात्री झाली. २०२४ मध्ये १३ हजार ५९४ आणि २०२५ मध्ये पाच हजार ७०७ रॅपिड चाचण्या झाल्या; मात्र एलिसा तपासणीद्वारे आजाराची खात्री झाल्याची नोंद नाही. यंदा ऑगस्टपर्यंत सात हजार ३०५ लेप्टो रॅपिड चाचण्या झाल्या असून, एलिसा तपासणीद्वारे आजाराची खात्री झालेली नाही.
चिकुनगुनियाची तपासणीही थांबली
चिकुनगुनियाच्या तपासण्यांमध्येही घट झाली आहे. २०२४ मध्ये रुग्णालयात १८५ रॅपिड चाचण्या करण्यात आल्या आणि त्यापैकी एका रुग्णाच्या आजाराची एलिसा तपासणीद्वारे खात्री झाली. २०२५मध्ये १४३ रॅपिड चाचण्या झाल्या; मात्र एलिसा तपासणीची नोंद नाही. २०२६ मध्ये ऑगस्टपर्यंत रॅपिड तसेच एलिसा अशा दोन्ही तपासण्यांची नोंद शून्य आहे.
एलिसा प्रत्येक रुग्णासाठी आवश्यक नाही
रॅपिड चाचणी आणि एलिसा तपासणी यांचा उपयोग आजाराच्या टप्प्यानुसार वेगवेगळा असू शकतो. रुग्णाची लक्षणे, आजाराचा कालावधी आणि प्राथमिक चाचणीचा निष्कर्ष यानुसार पुढील तपासणी केली जाते. रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरांच्या माहितीनुसार, प्रत्येक रुग्णासाठी एलिसा तपासणी करणे आवश्यक नसते. गरज भासल्यास ही तपासणी केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.