कल्हे गावात सोनं लुटण्याचा उत्साह

कल्हे गावात सोनं लुटण्याचा उत्साह
Published on: 

कल्हे गावात सोनं लुटण्याचा उत्साह
बहिरी देवाच्या मंदिरात ग्रामस्थांची गर्दी; आपट्याच्या पानांचे पूजन करून दिल्या शुभेच्छा
पनवेल, ता. २१ (बातमीदार) : शिवकालीन परंपरेचा वारसा जपणाऱ्या पनवेल तालुक्यातील ऐतिहासिक कल्हे गावात दसऱ्यानिमित्त ‘सोनं लुटण्याची’ पारंपरिक प्रथा यंदाही उत्साहात पार पडली. गावाचे ग्रामदैवत बहिरी देवाच्या मंदिराच्या अंगणात ग्रामस्थ एकत्र आले. आपट्याच्या पानांचे पूजन करून प्रतीकात्मक सोनं लुटण्यात आले. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात सहभागी होत एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
कल्हे गावाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गावात सोनं लुटण्याची प्रथा सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पिढ्यान्‌पिढ्या जपल्या जाणाऱ्या या परंपरेला गावाच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनात विशेष महत्त्व आहे.
दसऱ्याच्या दिवशी मंदिराचे पुजारी सर्वप्रथम आपट्याची पाने गोळा करून बहिरी देवाच्या चरणी अर्पण करतात. त्यानंतर ही पाने मंदिराच्या अंगणात ठेवली जातात. ग्रामस्थ एकत्र आल्यानंतर पारंपरिक पद्धतीने त्यांचे वाटप केले जाते. या वेळी मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण होते.
सोनं लुटल्यानंतर ग्रामस्थ आपट्याची पाने घरी घेऊन जातात. देवाऱ्यात त्यांची स्थापना करून पूजन केले जाते. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना पाने देऊन आशीर्वाद घेतले जातात. तसेच नातेवाईक, मित्र आणि परिचितांना आपट्याची पाने देत सुख, समृद्धी आणि भरभराटीच्या शुभेच्छा दिल्या जातात.

परंपरेतून सामाजिक एकोपा दृढ
आपट्याची पाने सोन्याचे प्रतीक मानून ती एकमेकांना देण्याची प्रथा केवळ धार्मिक विधी नसून सामाजिक सलोखा जपणारी परंपरा आहे. या निमित्ताने गावातील विविध पिढ्यांतील नागरिक एकत्र येतात. परस्परांना शुभेच्छा देताना नातेसंबंध दृढ होतात, तर ज्येष्ठांचा आदर आणि लहानांवरील प्रेम व्यक्त होते. बदलत्या काळातही कल्हे ग्रामस्थांनी सामूहिक सहभागातून ही परंपरा जिवंत ठेवली आहे. त्यामुळे गावाचा सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com