

ऑडिओची सत्यता तपासूनच
निष्कर्ष काढा ः आनंद परांजपे
श्रीकांत शिंदे यांच्या नावाच्या उल्लेखावरून चौकशीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केलेल्या ध्वनिफितीतील संभाषणाची सत्यता पडताळून संबंधित प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट करावी. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी; मात्र तपासाआधी राजकीय निष्कर्ष काढणे टाळावे, असे आवाहन शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले.
जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऐकविलेल्या ध्वनिफितीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख ऐकू येत असल्याचा दावा परांजपे यांनी केला. त्यामुळे या संभाषणाची पार्श्वभूमी काय आहे, त्यातील आवाज आणि मजकूर खरा आहे का, याची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी संबंधित ध्वनिफित सरकारकडे सुपूर्द करावी, अशी मागणीही त्यांनी केली. ५०० कोटींच्या कथित व्यवहारासंदर्भातील आरोपांवर बोलताना, एकनाथ शिंदे यांनी आपण पैसे घेतलेही नाही आणि दिले नाहीत, अशी भूमिका स्पष्ट केल्याचे परांजपे यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, जरांगे-पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी ते स्वतः वाशी येथे गेले. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे परांजपे यांनी सांगितले.
................................
आरोप-प्रत्यारोपांचे स्वरूप नको
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे-पाटील यांनी आपला लढा सुरू ठेवावा; मात्र ध्वनिफितीच्या प्रकरणाला राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे स्वरूप देऊ नये, असे परांजपे यांनी स्पष्ट केले. संबंधित ध्वनिफितींची निष्पक्ष चौकशी झाल्यास या प्रकरणातील सत्य समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आता सरकार या मागणीवर काय भूमिका घेते आणि चौकशीतून कोणती माहिती पुढे येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.