भादाणेत रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरीला

भादाणेत रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरीला
Published on: 

मुरबाड, ता. २५ (बातमीदार) : तालुक्यातील भादाणे गावात दूरसंचार मनोऱ्याला वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरट्यांनी नेल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे चार दिवसांपासून गावातील भ्रमणध्वनी आणि इंटरनेट सेवा अडचणी येत असल्याची माहिती प्रशांत हंडोरे यांनी दिली. दरम्यान, सरळगाव ते किन्हवली मार्गावरही अज्ञात वाहनामुळे विद्युत खांब आणि तारांचे नुकसान झाल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला.
दसऱ्याच्या दिवशी गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे ग्रामस्थ घरीच थांबले होते. याच संधीचा फायदा घेत रस्त्यालगत असलेले विद्युत रोहित्र चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे दूरसंचार मनोऱ्याच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला असून, गावातील इंटरनेट सेवेत अडथळे निर्माण झाले आहेत. शुक्रवारी रात्री एका अज्ञात वाहनामुळे सरळगाव ते किन्हवली रस्त्यावरील विद्युत खांब आणि तारा तुटल्याची घटना घडली. या मार्गावरील काही खांब वाकले असून, काही ठिकाणी ग्राहकांच्या वीजजोडण्यांच्या तारांसह मीटरचेही नुकसान झाले आहे. संगम फाट्याजवळ वीजपुरवठा करणारी तार तुटल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वीजपुरवठा बंद केल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. या घटनांमुळे परिसरातील वीजपुरवठा आणि दूरसंचार सेवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com