

स्कायवॉकवरून फेकलेल्या बाळाचा मृत्यू
घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) : नशेच्या व्यसनावरून पती-पत्नीत होणाऱ्या सततच्या वादातून पित्याने आपल्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २५) रात्री घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आरव शेख या बाळाचा उपचारादरम्यान मंगळवारी (ता. २७) मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पिता जाफर शेख (२३) याला यापूर्वीच अटक केली असून, आता हत्येशी संबंधित कलमांनुसार तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफर शेख आणि त्याची पत्नी आरती शेख (२२) हे घाटकोपरमधील सर्वोदयनगर परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांचा विवाह सुमारे दोन वर्षांपूर्वी झाला होता. जाफर याला नशेचे व्यसन असल्याने गेल्या काही महिन्यांपासून पतिपत्नीत वारंवार वाद होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अशाच एका वादानंतर जाफर याने आपल्या नऊ महिन्यांच्या मुलाला घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवरून खाली फेकल्याचा आरोप आहे. या घटनेत बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला सायन रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
आरोपी जाफर शेख याच्या विरोधात यापूर्वी मानखुर्द आणि नेहरूनगर पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एका प्रकरणाचा संबंध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याशी असल्याचेही सांगण्यात येत आहे. घटनेमागील नेमकी परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली जात आहे, अशी माहिती परिमंडळाचे पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.