चेंबूरचे झोपडपट्टीवासीय न्यायालयात

चेंबूरचे झोपडपट्टीवासीय न्यायालयात
Published on: 

चेंबूरचे झोपडपट्टीवासीय न्यायालयात
अतिक्रमण कारवाईचे प्रकरण; सर्वेक्षण, पुनर्वसनाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गालगतची घरे पाडण्यापासून संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारी याचिका चेंबूरस्थित झोपडपट्टीवासीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चार संस्थांनी उच्च न्यायालयात केली आहे. या पाडकामामुळे जवळपास ३,५०० रहिवासी बेघर होणार असल्याचा दावा याचिकेतून केला आहे. 
ही याचिका डॉ. आंबेडकर सेवा समिती, जय भवानी समर्थ सोसायटी, समता नगर झोपडपट्टी रहिवासी संघ आणि भीमशक्ती झोपडपट्टी विकास संघ या संस्थांनी वकील हितेंद्र गांधी यांच्यामार्फत दाखल केली आहे.  याचिकेत संबंधित प्राधिकरणांना संयुक्त सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कोणत्या घरांवर बुलडोझर चालणार आहे, हे निश्चित करून, रहिवाशांना बेदखल करण्यापूर्वी पात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाचा विचार करावा. पडताळणी आणि पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे अंतरिम संरक्षण देण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे. मध्य रेल्वेने १५ ऑक्टोबरला जाहीर नोटीस प्रसिद्ध करून कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे मार्गालगत राहणाऱ्या कथित अनधिकृत रहिवाशांना ३० दिवसांत जागा रिकामी करण्यास सांगितले होते. त्यानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून आलेल्या एका पत्रानुसार, रेल्वे प्रशासनाने १७ नोव्हेंबरपासून ही पाडकाम मोहीम सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. रेल्वेच्या अतिक्रमणाशी संबंधित ७ ऑक्टोबरच्या उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचाही याचिकेत संदर्भ दिला आहे, त्यानुसार रहिवाशांना हटवण्यापूर्वी प्रशासनाने कागदपत्रांची पडताळणी, रहिवाशांची ओळख पटवणे आणि पुनर्वसनासारख्या विहित प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. 
...
सर्वेक्षणाविनाच कारवाईचा घाट 
रेल्वेच्या जाहीर नोटीसमध्ये काही किलोमीटर खुणांमधील (किलोमीटर मार्कर) परिसर बाधित असल्याचे म्हटले आहे; परंतु नेमकी कोणती घरे पाडणार आहेत, याची कोणतीही सविस्तर यादी (घर किंवा सीटीएस-निहाय) दिलेली नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच जमिनीच्या अचूक सीमांकन करण्यासाठी आणि बाधित घरे ओळखण्यासाठी रेल्वे प्रशासन, जिल्हाधिकारी, नगर सर्वेक्षण अधिकारी व इतर संबंधित प्राधिकरणांनी मिळून संयुक्त सर्वेक्षण करावे, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.