

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे रखडलेले मानधन त्वरित सुरू करावे, बंद करण्यात आलेली ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी आणि शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार दरमहा २,१०० रुपये मानधन द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने मंगळवारी (ता. ३) मंत्रालयावर राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता आझाद मैदानातून या आंदोलनाला सुरुवात होणार असून, माजी खासदार वृंदा करात, राष्ट्रीय अध्यक्षा तथा माजी खासदार पी. के. श्रीमती आणि राष्ट्रीय उपाध्यक्षा मरियम ढवळे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक पात्र महिलांचे ई-केवायसी पूर्ण करूनही मानधन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा संघटनेचा दावा आहे. पात्र महिलांचे थकीत आणि नियमित मानधन त्वरित सुरू करावे, ई-केवायसी पोर्टल खुले ठेवावे तसेच नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
केवळ लाडकी बहीण योजनेपुरते मर्यादित न राहता महागाई, अन्नसुरक्षा, पाणीटंचाई, सार्वजनिक आरोग्य आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांनाही या आंदोलनातून वाचा फोडण्यात येणार आहे. सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे आनंदाचा शिधा त्वरित वितरित करावा, अन्नसुरक्षा योजना लक्ष्याधारित न ठेवता तिचे सार्वत्रिकीकरण करावे आणि वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख रुपये करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.