स्वच्छतागृह वापरासाठी पाच रुपये! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

धारावी - "राईट टू पी'च्या चळवळीमुळे सार्वजनिक स्वच्छतागृहात महिलांना कोणतेही शुल्क आकारले जात नाही; मात्र दादरच्या फलाट क्रमांक सहा येथे असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहात मात्र महिलांकडून पाच रुपये आकारले जात असल्याबद्दल महिलावर्गांत तीव्र नाराजी आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराची माहिती दादर येथील रेल्वे अधिकाऱ्यांना नाही. 

मध्य रेल्वेवरचे दादर हे सर्वाधिक वर्दळीचे स्थानक आहे. या स्थानकातील फलाट क्रमांक सहा येथील स्वच्छतागृह चालवण्याचे कंत्राट खासगी कंत्राटदाराकडे दिले आहे. या कंत्राटदाराची माणसे स्वच्छतागृहात येणाऱ्यांकडून सर्रास पाच रुपये आकारत आहेत. दादर स्थानकात बाहेरगावाहून मोठ्या संख्येने नागरिक येतात. त्यांना फारशी माहिती नसल्याने ते निमूटपणे पाच रुपये देतात. ज्या लोकांना याची माहिती असते, ते पैसे देण्यास नकार देतात. त्यावरून कर्मचारी आणि नागरिकांत वाद होतात. वास्तविक स्वच्छतागृहाच्या बाहेर कंत्राटदाराचे नाव, शुल्क आकारणीचा दर हे सर्व नमूद करणारा फलक असतो; पण या स्वच्छतागृहाच्या बाहेर असा कोणताही फलक लावलेला नाही. तरीही हे कर्मचारी पैसे मागत आहेत. 

दमदाटीने पैसे वसुली 
महिला प्रवाशांनी स्वच्छतागृहाचा वापर केल्यास त्यांच्याकडून भांडून, त्यांना दमदाटी करून पैसे घेतले जात आहेत. महिला प्रवासी घाईत असल्यामुळे वाद न घालता मुकाटपणे पैसे मोजून आपल्या मार्गी निघून जातात. याचाच गैरफायदा घेत काही लोक बळजबरीने पैसे वसूल करत असल्याने महिला प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. 

हे स्वच्छतागृह हिमालय प्रा. लिमिटेड कंपनीस "पे ऍण्ड यूज' तत्त्वावर चालवण्यास दिले आहे. तेथील कर्मचारी पाच रुपये घेत असतील, तर ते पूर्णतः चुकीचे आहे. या प्रकरणात मी स्वतः चौकशी करेन. 
- प्रवीण शेळके, दादर स्थानक प्रबंधक.

Web Title: Toilets for the use of five rupee