अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर लवकरच टोल? 

दीपक घरत
Saturday, 17 October 2020

मुबंई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे फाटा ते इंदापूरदरम्यान चौपदरीकरणाचे काम अर्धवट आहे. त्या या परिस्थितीमुळे संताप व्यक्त होत आहे. त्यानंतरही टोलवसुलीसाठी हालचाली सुरू झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  

पनवेल : मुबंई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे फाटा ते इंदापूरदरम्यान चौपदरीकरणाचे काम अर्धवट आहे. त्यातच ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने प्रवाशांचे अक्षरश: कंबरडे मोडते. या परिस्थितीमुळे संताप व्यक्त होत आहे. त्यानंतरही टोलवसुलीसाठी हालचाली सुरू झाल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून खारपाडा येथे टोलनाक्‍याच्या कामाला झालेली सुरुवात या दृष्टीने महत्त्वाची समजण्यात येत आहे. 

हे वाचा : महिलांच्या लोकल प्रवासाचा सावळा गोंधळ

कोकणात जाण्यासाठी मार्ग सुकर व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणासाठी विविध स्तरावर आंदोलने, मोर्चे काढण्यात आले होते. त्यामुळे अखेर 2011 मध्ये कामे सुरू झाली. पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या 84 किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम 2014 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना ते अद्यापही अर्धवट आहे. काम पूर्ण करण्यासाठी जून 2020 पर्यंतची दुसऱ्यांदा मुदत देण्यात आली होती. आता हा मुहूर्तही हुकल्याने रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराकडून जून 2021 ही तिसरी "डेडलाईन' घेण्यात आली आहे. हे काम "बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा' या तत्त्वावर करण्यात येत असल्याने हा खर्च वसूल करण्यासाठी टोल आकारण्यात येणार आहे. त्यासाठी खारपाडा येथील जुन्या टोलनाक्‍याच्या ठिकाणी पुन्हा नवीन नाका बांधण्यात येत आहे. 

खूशखबर : सिडकोच्या सदनिक विजेत्यांना पुन्हा संधी

मुंबई-गोवा महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील काम अपूर्ण आहे. त्यातच या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवास नकोसा होतो. वाहनांचेही नुकसान होते. या परिस्थितीत महामार्ग विभागाने खड्डे बुजवण्यास प्राधान्य देणे आवश्‍यक असताना टोलवसुलीसाठी कंत्राटदाराने हालचाली सुरू केल्या आहेत. हे संतापजनक आहे, असे प्रवासी महेंद्र पाटील यांनी सांगितले. 

प्रकल्पाच्या किमतीत वाढ नाही 
मुंबई - गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण होण्यास उशीर होत असला, तरी प्रकल्पाच्या किमतीत वाढ झालेली नसल्याचा दावा प्रकल्प अधिकारी प्रशांत फेडगे यांनी केला आहे. या चौपदरीकरणासाठी 943 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

84 पैकी 60 किलोमीटरचे काम पूर्ण? 
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील 84 किलोमीटर अंतरातील 60 किलोमीटरचे काम पुरे झाले असल्याची माहिती महामार्ग अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रकल्पात अडथळा ठरत असलेल्या काही जमिनी हस्तांतरण करणे आणि कुंडलिका नदीवरील पूल आणि अन्य काही कामे शिल्लक असल्याने जून 2021 पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे, असा दावाही ते करत आहेत. 

मुंबई - गोवा महामार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झाल्याने कराराच्या आधारावर कंत्राटदाराकडून टोलनाका सुरू केला जाऊ शकतो; मात्र त्यापूर्वी अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी करून माहिती घेण्यात येईल. 
- प्रशांत फेडगे, प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभाग 

मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान होत असलेल्या विलंबाचे कारण हे भ्रष्टाचार असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्याची चौकशी करणे अपेक्षित आहे. 
- संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते 

(संपादन : नीलेश पाटील)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Toll on incomplete Mumbai-Goa highway soon? The passenger will complain