ठाण्यातील किरकोळ बाजारात टोमॅटो शंभरीपार

शर्मिला वाळुंज
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पावसाचा फटका आणि भाज्यांची कमी झालेली आवक यामुळे बाजारात भाज्यांचे दर कमालीचे वाढले आहे. ठाण्यातील किरकोळ बाजारात टोमॅटोने शंभरी गाठली असून कोबी, भेंडी, गवार, फरसबी या भाज्यांनीही ८० रुपये किलोचा टप्पा गाठला आहे. नवी मुंबईत मात्र हेच दर ६० ते ७० प्रतिकिलो असे आहेत. 

ठाणे : श्रावणात भाज्यांचे दर चढेच असल्याने गृहिणी या दिवसांत किचनचे बजेट थोडे वाढीवच ठेवतात; परंतु पावसाचा फटका आणि भाज्यांची कमी झालेली आवक यामुळे बाजारात भाज्यांचे दर कमालीचे वाढले आहे. ठाण्यातील किरकोळ बाजारात टोमॅटोने शंभरी गाठली असून कोबी, भेंडी, गवार, फरसबी या भाज्यांनीही ८० रुपये किलोचा टप्पा गाठला आहे. नवी मुंबईत मात्र हेच दर ६० ते ७० प्रतिकिलो असे आहेत. 

पावसाचा फटका भाज्यांसोबत वाहतूक व्यवस्थेलाही बसला असून गेले दोन-तीन दिवस वाहतूकच बंद असल्याने कल्याण व वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत वाहनांची संख्या रोडावली आहे. पुणे आणि नाशिक भागातून भाज्यांची आवक घटली आहे. माल खराब होत असल्याने व्यापारीही मालाची खरेदी करत नाहीत; त्यामुळे आवक अर्धीअधिक घटल्याचे व्यापारी किसन दांगट यांनी सांगितले. 

सोमवारपासून बाजारात भाज्यांची आवक कमी होत भाज्यांच्या दरात दहा ते पंधरा टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे; तर किरकोळ बाजारात वीस ते तीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याचे दांगट म्हणाले. भाज्या महाग आहेत; परंतु आता तर शंभर रुपये किलो झाल्याने आमचे बजेट पूर्णतः कोलमडले आहे. उपवास सोडण्यासाठी दोन-तीन भाज्या लागतात, परंतु आता एकाच भाजीवर उपवास सोडावा लागेल असे, शामल शिंदे यांनी सांगितले. 

टोमॅटोची आवक मंदावली 
श्रावणात भाज्यांना मागणी जास्त असल्याने या दिवसांत भाज्यांचे दर हे चढेच राहतात; परंतु नाशिक, पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे या भागातून होणाऱ्या टोमॅटोची आवक मंदावली आहे. उत्तर महाराष्ट्रातूनही माल येत नसल्याने किरकोळ बाजारात टोमॅटोने शंभरी गाठली आहे. तसेच कोबी, गवार, भेंडी, कारली या भाज्याही ८० ते १०० रुपये किलो दराने विकल्या जात आहेत.

ग्रामीण भागातही पावसाचा जोर वाढला असून शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. श्रावणात भाज्यांना मागणी जास्त असते, मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने या भाज्यांचे दर वाढले आहेत. ग्रामीण भागातून मालाची आवक योग्य प्रमाणात सुरू झाली की दर स्थिरावतील; परंतु श्रावणात दर चढेच राहतील.
- रतन पिंगळे, भाजी विक्रेते

बाजारात सिमला मिरची, भेंडी, तोंडली अशाच भाज्या दिसतात. मेथी, कोथिंबीर ठराविक विक्रेत्यांकडेच दिसते; परंतु मेथी ६० ते ७० रुपये जुडी आहे, तर कारले, भेंडी, कोबी ८० रुपये किलो आहे. शाकाहारीपेक्षा मांसाहारी जेवण आता आम्हाला स्वस्त वाटू लागले आहे. 
- रोशना पाटील, गृहिणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tomato Shambharipar at the retail market in Thane