#ToorScam तब्बल 21 हजार टनांचा काळाबाजार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - 'सकाळ'ने "तूरडाळीच्या गैरव्यवहाराची बरणी' फोडल्यानंतर "महाराष्ट्र स्टेट ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन'ने मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात, तसेच या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाठवलेली तब्बल 21 हजार टन डाळ शिधावाटप दुकानांतून काळ्या बाजारात गेल्याचे उघड झाले आहे. या सौद्यात दुकानदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी दलालांमार्फत कोट्यवधी रुपये जमवले. ही डाळ गुजरात, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पाठविण्यात आली; मात्र रेशनिंग नियंत्रकांनी ही डाळ दुकानांमधून थेट ग्राहकांच्या घरातच गेल्याचा दावा केला आहे.

"सकाळ'ला मिळालेल्या माहितीनुसार मार्केटिंग फेडरेशनने शिधावाटप विभागाकडे पाठवलेली डाळ मुंबई आणि ठाणे परिसरातील चार हजारांहून अधिक दुकानांना पाठविण्यात आली. प्रत्येक दुकानाला सरासरी पाच हजार किलो डाळीचे वाटप करण्यात आले; मात्र ती डाळ ग्राहकांना न देता तिची पाकिटे फोडून तो माल काळ्या बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात आला.

...असे चालते रॅकेट
पणन विभागाकडून आलेली तूरडाळ शिधावाटप विभागामार्फत दुकानांत पाठविण्यात येतो; मात्र काही अधिकारी आणि दुकानदारांच्या मदतीने या डाळीची शहराबाहेर पाकिटे फोडतात. या डाळीचे पॅकिंग करण्यासाठी, तसेच तिची साठवणूक करण्यासाठी मशिन व गोदामांची आवश्‍यकता असल्यामुळे मुंबईनजीकच्या 12 दालमिलचा वापर होतो. या मिलमध्ये मागणीनुसार डाळ पाकिटांमध्ये भरण्यात येते. नंतर ती डाळ गुजरात, नाशिक आणि पुण्याला पाठविण्यात येते. तेथून ही डाळ ट्रकमध्ये भरून नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटमध्ये काळ्या बाजारातून येते.

ती खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे त्या मालाची पक्की पावती नसते. या सर्व प्रकाराला शिधावाटप विभागाकडून अभय दिले जाते. त्याबदल्यात शिधावाटप विभागातील संबंधितांना राज्यभरातून दर महिन्याला कोट्यवधींचा हप्ता दिला जातो. या विभागातील मुंबईतील अधिकाऱ्यांना नवी मुंबई, ठाणे व मुंबई परिसरातून किमान 50 कोटींचा हप्ता पोच केला जातो, अशी माहिती पुढे आली आहे. या गैरव्यवहारात शिधावाटप विभागाच्या भरारी पथकांचाही सहभाग असतो. एखाद्या जिल्ह्यात किंवा एखाद्या दुकानदारावर कारवाई होऊ नये, यासाठी त्यांनाही कोट्यवधींचे हप्ते दिले जातात.

धान्याचे पॅकिंग करणाऱ्या मिलमधून दिलेल्या परवान्याप्रमाणे तूरडाळीचे वाटप होते की नाही, याची तपासणी सर्व यंत्रणांनी करायला हवी. या तपासणीनंतरही धान्यगळती होत असल्यास ती गंभीर बाब आहे. ती गळती रोखण्यासाठी पणन विभाग व मार्केटिंग फेडरेशन, तसेच शिधावाटप विभागाने एकत्रित नियोजनबद्ध कारवाई करायला हवी. तूरडाळ गैरव्यवहाराबाबत "सकाळ'ने छापलेल्या बातम्यांची कात्रणे मी रोज राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवत आहे. त्यांच्या पातळीवर तिन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून तोडगा काढण्यात येईल.
- बिजयकुमार, अतिरिक्त मुख्य सचिव, कृषी व पणन विभाग

"सकाळ'च्या बातमीनंतर शिधावाटप विभागामार्फत मुंबई, ठाणे व इतर परिसरात रास्त भाव दुकानांमध्ये तपासणी सुरू करण्यात आली आहे. शिधावाटप विभागाने पाठवलेली तूरडाळ ग्राहकांपर्यंत गेल्याचे पॉसमशिनमधील नोंदीतून सिद्ध होते. उर्वरित डाळ दुकानांमध्ये शिल्लक असल्याचे निदर्शनास आले आहे; मात्र ज्या ग्राहकांनी डाळ खरेदी केली, त्यांच्या घरात जाऊन पुन्हा तपासणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
- दिलीप शिंदे, मुख्य नियंत्रक, भरारी पथक, शिधावाटप विभाग

Web Title: #ToorScam 21000 tone black market