esakal | सायन-पनवेल महामार्ग खासगी बसला आंदण
sakal

बोलून बातमी शोधा

सायन-पनवेल महामार्ग खासगी बसला आंदण

सायन-पनवेल महामार्ग खासगी बसला आंदण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंब : शीव-पनवेल महामार्गावर प्रवासी मिळवण्यासाठी रात्रीच्या वेळी टुरिस्ट बसचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक खासगी प्रवासी बसगाड्या महामार्गावर उभ्या केल्या जात असल्याने नोकरदारांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ एलपी, खारघर आणि कळंबोली येथे रात्री ८ ते पहाटे २ वाजेपर्यंत महामार्गावर टुरिस्ट बसचालकांकडून मनमानी सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या बसगाड्यांच्या मागोमाग इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. महामार्गावरील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिस हजर नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.

हेही वाचा: आरक्षणाची मर्यादा घटनेच्या चौकटीत वाढविण्याचा राज्याला अधिकार - नारायण राणे

सरकारने कोविड निर्बंधांमध्ये सूट दिल्याने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक जण गावच्या दिशेने निघाले आहेत. कोल्हापूर, सांगली, पुणे आणि कोकणात जाणाऱ्या भक्तांमुळे मुंबई-पुणे आणि गोवा महामार्गावर प्रवाशांची वर्दळ वाढली आहे, परंतु लांब पल्ल्याच्या टुरिस्ट बस चालकांकडून थेट शीव-पनवेल महामार्गावर मनमानी पद्धतीने रस्त्यावर थांबत असल्याचा प्रकार रात्रीच्या वेळी घडत आहे.

मुंबईतील डोंगरी, मुंबई सेंट्रल, लालबाग, दादर तसेच मिरा-भाईंदरमधून सुटणाऱ्या या खासगी टुरिस्ट बसगाड्या महामार्गावरील बसथांब्यांवरील प्रवासी मिळवण्यासाठी महामार्गावरील एका मार्गिकेत उभ्या केल्या जात आहेत. याचा मोठा फटका महामार्गावरील वाहतुकीवर होत आहे.

हेही वाचा: राज्यात वाढतोय साक्षरतेचा टक्का; महाराष्ट्र बाराव्या क्रमांकावर

एसटी, बेस्ट आणि एनएमएमटीच्या बसथांब्यांवर गावी जाणारे प्रवासी उभे असतात. मध्यरात्री वाशी टोलनाक्यानंतर खासगी बसचालक प्रमुख बसथांब्यांवर प्रवाशांना घेण्यासाठी गाड्या उभ्या करतात. वाशी उड्डाणपुलाखाली प्रवासी घेण्यासाठी खासगी बसगाड्या अनेक तास उभ्या असतात. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची चौकी असूनही वाहतुकीचे नियम राजरोसपणे मोडले जात आहेत.

सानपाडा उड्डाणपुलाखाली बसगाड्या उभ्या केल्या जात आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून येणारे मालवाहू ट्रक तसेच अवजड वाहने पुण्याच्या दिशेने निघताना येथे वाहतूक कोंडी होते. जुईनगर आणि नेरूळ एलपी येथे रात्री ८ नंतर वाहतूक कोंडी होत असते. एलपी येथे शहरातील वाहतूक, एमआयडीसीची वाहतूक आणि सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीत या टुरिस्ट बसची भर पडत असल्याने खोळंबा होतो.

खारघर आणि कळंबोली येथे सारखीच परिस्थिती आहे. कळंबोली येथे मॅकडॉनल्डसमोर महामार्गावर खासगी बसगाड्यांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे जुना पुणे मार्ग, बाह्य वळण आणि जलदगती मार्गावर जाणाऱ्या वाहनांची अडवणूक होत असते. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी तैनात वाहतूक पोलिस गायब असतात. याबाबत पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

हेही वाचा: सहा जिल्ह्यांमध्ये स्थिती चिंताजनक

कारवाई का नाही?

सायन-पनवेल महामार्गावर खासगी टुरिस्ट बसचालकांना थांबण्यासाठी काही विशिष्ट जागा निश्चित करण्यात आल्या आहेत, परंतु त्या जागा सोडून या बसगाड्या मोक्याच्या ठिकाणी उभ्या केल्या जातात. अशा बस चालकांवर कारवाई करण्यासाठी रात्रीच्या वेळेस वाहतूक पोलिस कर्मचारी हजर नसतात. त्यामुळे ही कारवाई जाणूनबुजून केली जात नाही का, असा सवाल मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

अंडाबुर्जीच्या गाड्यांचे बस्तान

गेले काही महिने शीव-पनवेल महामार्गावर सीबीडी-बेलापूरनंतर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेशेजारी अंडाबुर्जी, चहावाल्यांनी दुकाने थाटली आहेत. कोपरा येथील टोलनाक्याजवळही अशा खाद्यपदार्थांची टेबले मांडली जातात. या ठिकाणी खाण्यासाठी अवजड वाहन चालक थेट रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जातात. त्यामुळे या परिसरात गंभीर अपघाताची शक्यता प्रवासी व्यक्त करीत आहेत.

loading image
go to top