पर्यटन महामंडळाचे वसतिगृह धूळ खात

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

वार्षिक भाडे आवाक्‍याबाहेर असल्‍याने निविदांकडे पाठ 

खारघर : पर्यटन विकास महामंडळाने नऊ कोटी रुपये खर्च करून खारघरमध्ये उभारलेले वसतिगृह भाड्याने देण्यासाठी महामंडळाने दोन वेळा निविदा काढल्या; मात्र कंत्राटदार मिळत नसल्यामुळे वसतिगृह धूळ खात असून वसतिगृह कोणी भाड्याने घेता का, अशी म्हणण्याची वेळ पर्यटन विकास महामंडळावर आली आहे.  

पर्यटन विकास महामंडळाने राज्यात अनेक ठिकाणी पर्यटक निवास, हॉटेले व उपाहारगृहे उभारली आहेत. खारघरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना अल्पदरात वसतिगृहात निवास करता यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने खारघर, सेक्‍टर १२, ग्रीन फिंगर ग्लोबल स्कूलशेजारी, प्लॉट नं. १० येथील राखीव भूखंडावर चार मजली वसतिगृह उभारले आहे. वसतिगृहात २९ खोल्या, कॉन्फरन्स रूम, जेवणासाठी रेस्टॉरंट, व्यायामशाळा, ग्रंथालय, वाचनालय आदी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच फर्निचर व इतर कामे पूर्ण करून वसतिगृहाचे परिपूर्ण कामे करून गेल्या दीड वर्षात दोन वेळा वसतिगृह भाड्याने देण्यासाठी निविदा काढल्या; मात्र निविदांमध्ये वसतिगृहाचे वार्षिक भाडे मोठ्या प्रमाणात आकारण्यात आल्याने कंत्राटदाराने पाठ दाखविली आहे. परिणामी, दीड वर्षापासून वसतिगृह धूळ खात पडून आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourist corporation hostels were in dust