प्रबळगडावर पर्यटकांचा पूर

सकाळ वृत्‍तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

मुसळधार पावसाला झुगारून दोन दिवसांत हजारो पर्यटकांची नोंद

मुंबई :  सर्वच पावसाळी पर्यटन स्थळांवर जाण्यास प्रशासनाने बंदी घातल्याने पनवेलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मात्र अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या माची प्रबळगड परिसरातील ठाकूरवाडी येथील धबधब्यावर रविवारी पर्यटकांचा जणूकाही पुरच आला हाेता; तर गाढेश्‍वर धरण परिसरात असलेल्या पोलिस बंदोबस्तामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या पदरी निराशा पडली.

पावसाळी पर्यटनाकरिता प्रबळ गडावर येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गडाची माहिती नसल्याने उत्साहाच्या भरात येणाऱ्या पर्यटकांना अनेकदा वाट चुकल्याने गडावर अडकून पडावे लागते. तसेच ट्रेकिंग करताना अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना प्रबळ गडावर घडल्याने वन विभागाच्या परवानगीने या भागातील स्थानिक नागरिक आणि अधिकाऱ्यांची संयुक्त वन व्यवस्थापन समिती बनवण्यात आली असून, येथे येणाऱ्या पर्यटकांची नोंद समितीतर्फे करण्यात येते.

माची प्रबळगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या पाच पर्यटकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. वाट चुकण्याच्या व पडून मृत्यू होण्याच्या सर्वांत जास्त दुर्घटना प्रबळगडावर झाल्या आहेत. यामुळे वन विभाग रायगड (अलिबाग) व जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन केली. किल्ले प्रबळगड व परिसरात पर्यटन विकास तसेच सुरक्षेच्या अनुषंगाने पर्यटकांची नोंद करण्याच्या कामाला मागील वर्षापासून सुरुवात केली आहे. २८ जून २०१८ पासून प्रबळगडावर जिल्हाधिकारी व वन विभागाच्या आदेशाने काही नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. प्रबळगडावर येणाऱ्या पर्यटकांची नावनोंदणी करून त्यांच्याकडून २० रुपये प्रवेश शुल्क घेतले जात आहे. 

पोलिसांचा चोख बंदोबस्त
गाढेश्‍वर धरण परिसरात पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. अनेक जण पर्यटनासाठी येताना आपल्यासोबत मद्य घेऊन येत असल्याने तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मार्गांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली होती.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tourist on prabalgarh