अंधेरीच्या राजाला ट्रेडमार्क प्रमाणपत्र 

अंधेरीच्या राजाला ट्रेडमार्क प्रमाणपत्र 

मुंबई - आझादनगरमधील अंधेरीच्या राजाच्या मूर्तीला भारत सरकारच्या ट्रेड मार्क रजिस्ट्रीकडून प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आकर्षक देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेले अंधेरी मंडळ या वर्षी अंधेरीच्या राजासाठी अष्टविनायकांपैकी थेऊरमधील चिंतामणी मंदिराची प्रतिकृती साकारत आहे. 

आकर्षक देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मंडळाच्या गणेशोत्सवाचे हे ५३ वे वर्ष आहे. चिंतामणी मंदिराच्या प्रतिकृतीत ८ सप्टेंबरला बाप्पा विराजमान होणार आहे. हे मंदिर ४ हजार ३०० चौरस फूट परिसरात साकारले आहे. त्यासाठी ४० दिवस ४० कामगारांनी मेहनत घेतली आहे. बाप्पाची मूर्ती साडेआठ फुटांची आहे. हे मंदिर संपूर्ण लाकूड आणि फायबरचे बनवले आहे. मंदिराला साजेशी खास रोषणाई करण्यात येत आहे. अंधेरीच्या राजाचे विसर्जन अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला होते. मंडळाने मागील तीन वर्षांत पालीचे बल्लाळेश्‍वर, कोकणातले कुणकेश्‍वराचे मंदिर आणि गुजरातमधील अंबाजी मंदिर साकारले होते.

गणेशाचरणी ‘एक वही एक पेन’
मुंबईतील सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी बाप्पाच्या चरणी दानरूपाने पैसे व प्रसाद अर्पण करण्याबरोबरच किमान एक वही व पेनही द्यावा, असे आवाहन जोगेश्‍वरीतील ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ सोशल ग्रुपने केले आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विधायक कार्य साकारण्याचा व्हाॅट्‌स ॲप ग्रुपचा मानस आहे. मागील वर्षी मंडळांकडून उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळाला होता. अनेक मंडळांनी वही व पेनबरोबरच इतर शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदतही केली होती. सर्व साहित्य ग्रुपच्या सभासदांनी पालघर व जव्हार अशा आदिवासी भागातील आश्रमशाळांत मुलांना दिले. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहरी नागरिकांचा थोडा हातभार लागण्याच्या हेतूने अशी संकल्पना राबवल्याचे ग्रुपचे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com