ठाण्यात सॅटिस- 2 च्या खोदकामाने कोंडीत भर 

ठाणे : खोदकामामुळे कोपरी भागात होत असलेली वाहतूक कोंडी
ठाणे : खोदकामामुळे कोपरी भागात होत असलेली वाहतूक कोंडी

ठाणे : ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरातील वाहतूक कोंडीवर महत्त्वाचा उपाय ठरणारा सॅटिस- 2 (ठाणे रेल्वेस्थानक (पूर्व) रेल्वे स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प) या प्रकल्पाच्या कामाने पुन्हा वेग घेतल्याने स्कायवॉकखाली आणि ठिकठिकाणी रस्त्यावर बॅरिकेड्‌स उभारून खोदकाम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे आधीच कोंडी होत असलेल्या रस्त्यावर सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. याचा फटका खासगी वाहनांसह टीएमटी व इतर प्राधिकरणांच्या सार्वजनिक बस सेवेला बसत असून वाहतूक नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक होत आहे. 

ठाणे पश्‍चिमेकडील सॅटिसच्या धर्तीवर पूर्वेकडील रेल्वेस्थानक परिसरात सॅटीस- 2 हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पाच्या मुख्य कामाऐवजी या परिसरातील रस्त्यांवर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कॉंक्रीट खांबासाठी जागोजागी बॅरिकेड्‌स उभारून रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे.

त्याचबरोबर टीएमटी बस थांब्यासमोरील स्कायवॉकखालीदेखील खोदकाम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी येथील रस्त्याच्या खोदकामात ब्रिटिशकालीन रेल्वेरूळ सापडल्याने कामात विघ्न आले होते. त्यानंतर महापालिकेने रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर पुन्हा खोदकाम सुरू झाले. 

दरम्यान, या खोदकामामुळे टीएमटी बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरातील रस्ता अरुंद बनला आहे. त्यामुळे वाहनांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत असून सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या रांगा लांगून कोंडी वाढली आहे. याचा त्रास स्थानिक नागरिकांसह रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांनाही बसत आहे. कोपरीत बहुतांश शाळा असल्याने वाढत्या कोंडीचा त्रास शाळकरी विद्यार्थ्यांनाही बसत आहे. 

वाहतूक कोंडी नित्याचीच 
ठाणे पूर्वमध्ये रेल्वेस्थानक परिसर असल्याने मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिकांच्या वाहनांची वर्दळ असते; तसेच टीएमटी, बेस्ट, एनएमएमटी, मिरा-भाईंदर आणि वसई-विरार पालिकेच्या सार्वजनिक वाहतूक सेवेच्या बसदेखील याच भागातून बोरिवली-मिरा रोड, नालासोपारा व अन्य काही लांब पल्ल्याच्या मार्गावर धावतात. त्याचबरोबर, खासगी कंपनीच्या बस आणि खासगी वाहनेदेखील बेकायदा प्रवासी वाहतूक करीत असल्याने कोंडीचा त्रास सदासर्वकाळ उद्‌भवतो. शिवाय स्थानकाबाहेरील रस्त्यावर रिक्षा आणि खासगी वाहने उभी राहत असल्याने कोंडीत भर पडत आहे. 

बिनकामाचा "स्कायवॉक' 
नागरिकांची मागणी आणि गरज नसतानाही कोपरीत उभारलेला "स्कायवॉक' केवळ शोभेचे बाहुले बनला आहे. याच स्कायवॉकखाली टीएमटीचा बस थांबा आहे. सॅटिसचे काम सुरू असल्याने स्कायवॉकखालील बस थांब्यावर बस वळवताना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी बसचालक करतात. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com