#Pollutionissues कोंडी अन्‌ कचऱ्यामुळे हवा विषारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

मुंबई - वाहतूक कोंडी, बांधकामे, मुंबई पोर्ट ट्रस्टची सिमेंटची गोदामे आणि उघड्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे मुंबईतील चार प्रमुख ठिकाणची हवा विषारी होऊ लागली आहे. कुलाबा, माझगाव आणि वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) शहरातील सर्वात प्रदूषित ठिकाणे ठरली असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघड झाले आहे.

मुंबई - वाहतूक कोंडी, बांधकामे, मुंबई पोर्ट ट्रस्टची सिमेंटची गोदामे आणि उघड्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे मुंबईतील चार प्रमुख ठिकाणची हवा विषारी होऊ लागली आहे. कुलाबा, माझगाव आणि वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) शहरातील सर्वात प्रदूषित ठिकाणे ठरली असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघड झाले आहे.

वाहनांचे वाढलेले प्रदूषण आणि वातावरणातील बदलांमुळे काही दिवसांपासून वांद्रे परिसरात घशाचा त्रास, अस्थमा आणि डोळ्यांची जळजळ होणाऱ्या रुग्णांमध्ये ५० टक्के वाढ झाल्याचे स्थानिक डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले. कुलाबा आणि माझगाव परिसरातील प्रदूषणाचा सर्वाधिक फटका वृद्ध आणि लहान मुलांना बसत असून श्‍वसनाच्या आजाराचा किमान एक रुग्ण सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल होत आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलात तरंगत्या धूलिकणांचे प्रमाण (पी. एम. २.५) ३०९ मिलिग्रॅम प्रति क्‍युबिक मीटर होते. अंधेरीमध्ये ३१६ मिलिग्रॅम प्रति क्‍युबिक मीटर प्रमाण होते. पश्‍चिम द्रुतगती मार्गावरून रोज तीन ते चार लाखांहून अधिक वाहनांची वर्दळ असते. अशातच अंधेरी परिसरात नवी बांधकामेही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. श्‍वसन आणि घशाचा त्रास असणारे ५० टक्के रुग्ण आहेत. अस्थमाचेही रुग्ण वाढले आहेत, अशी माहिती छातीविकारतज्ज्ञ डॉ. राजीव मेहता यांनी दिली.

माझगाव, कुलाबा आणि फोर्ट परिसरात प्रदूषणामुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. श्‍वसनाशी संबंधित आजारांचे रुग्ण रोज रुग्णालयात येतात. अतिदक्षता विभागात किमान एक रुग्ण अशा आजारांचा असतो. वृद्ध आणि लहान मुलांमध्ये त्याचे प्रमाण अधिक आहे.
- डॉ. श्‍याम कांबळे, सेंट जॉर्जेस रुग्णालय 

अंधेरी परिसरात सर्दी-खोकला आणि डोळे चुरचुरण्याचे रुग्ण सर्रास आढळू लागले आहेत. वाढलेल्या प्रदूषणाचा तो परिणाम असल्याचे सहज लक्षात येते. मुख्य रस्त्यावर उभे राहिल्यास प्रदूषणामुळे होणारे त्रास तत्काळ जाणवू लागतात. 
- रमेश त्रिमुखे, अंधेरी 

परिसरात वाहने आणि सरकारी गोदामांमुळे प्रदूषणाचा त्रास होतोच. त्याचबरोबर कचऱ्याची समस्याही मोठी आहे. परिसरात कचरा वेळीच उचलला जात नसल्याने त्यापासूनही दुर्गंधी पसरत असते.
- हुसेन सैय्यद, माझगाव 

अंधेरी - चकाला परिसरात प्रदूषण मोजणारे केंद्र आहे. तिथे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. बांधकामामुळे वातावरणात धुळीचे प्रमाण अधिक असते. वाहतुकीची कोंडी नेहमीचीच समस्या आहे. त्यामुळे प्रदूषणाची पातळी सतत वाढलेली असते. अंधेरीत धूलिकणांचे प्रमाण (पी. एम. २.५) ३१६ मिलिग्रॅम प्रति क्‍युबिक मीटर होते.

वांद्रे-कुर्ला संकुल - वांद्रे-कुर्ला संकुलात तरंगत्या धूलिकणांचे प्रमाण (पी. एम. २.५) ३०९ मिलिग्रॅम प्रति क्‍युबिक मीटर होते. परिसरात वाहतूक कोंडीची सर्वाधिक समस्या आहे. पश्‍चिम द्रुतगती मार्गावरील आणि पूर्व उपनगरांतून येणाऱ्या वाहनांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल महत्त्वाचे जंक्‍शन आहे. त्यामुळे तिथे प्रदूषणाची पातळी नेहमीच वाढलेली असते.

माझगाव - माझगावमध्ये मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. मुंबई पोर्ट ट्रस्टची गोदामेही इथेच असल्याने प्रदूषणात भर पडते, अशी नागरिकांची तक्रार आहे. माझगाव परिसरात उघड्यावर पडलेला कचराही प्रदूषणात भर घालतो. प्रमुख बंदर असल्याने मोठ्या जहाजांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचाही मुद्दा आहेच. परिसरात पी. एम. २.५ चे सरासरी प्रमाण २५५ मिलिग्रॅमपर्यंत असते. मात्र, बुधवारी पावसाळी वातावरणामुळे ते १५० पर्यंत आले होते.

कुलाबा - कुलाबा परिसरातही प्रदूषणाचे प्रमुख कारण वाहनांची वर्दळ असल्याचे आढळले. कुलाबा परिसरात नेहमीच पी. एम २.५ चे प्रमाण २५५ मिलिग्रॅम प्रतिक्‍युबिक मीटरपर्यंत असते; मात्र बुधवारी संध्याकाळी पावसाळी वातावरणामुळे कुलाब्यातील हवा थोडीफार स्वच्छ झाली होती. तसेच परिसरात मासेमारी आणि व्यापारी बोटींचा वावरही मोठ्या प्रमाणात असतो.

Web Title: Traffic and Pollution Garbage