रायगड किल्‍ल्‍याचा मार्ग रोखला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी अपुऱ्या जागेत मोठ्या प्रमाणात खासगी वाहने उभी राहत आहेत.

महाड (बातमीदार) : रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी अपुऱ्या जागेत मोठ्या प्रमाणात खासगी वाहने उभी राहत आहेत. त्याचा फटका स्थानिकांसह एसटी बस सेवेला बसत आहे. 

दिवाळीपासून रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी आणि पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे पायथ्याशी वाहनांची गर्दी वाढली आहे. या ठिकाणी पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने दररोज कोंडी होत आहे. शनिवार आणि रविवारी तर हा प्रश्‍न अधिक बिकट होतो. या दिवशी चित्त दरवाजापासून रायगडवाडी गावाकडे; तर चित्त दरवाजा ते रोप वे फाटा या रस्त्यावर वाहने उभी असतात. त्यामुळे बिकट 
स्थिती असते. 

शिवसेनेवरचा अतिविश्र्वास नडला : देवेंद्र फडणवीस

रायगड किल्ल्याच्या पुढे रायगडवाडी, छत्री निजामपूर, बावळे, वाघेरी, टकमकवाडी आदी वाड्या आणि गावे आहे. त्यांच्यापर्यंत एसटी बस सेवा आहे. त्याला गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. दुसरीकडे रायगड रोप वेकडे जाणारी बस हिरकणीवाडी फाट्यापासूनच परत फिरते. यामुळे प्रवाशांना तीन-चार किमी पायपीट करावी लागते. 

शिवप्रेमी आणि पर्यटकांनी रायगडाच्या पायथ्याशी रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग करणे चुकीचे आहे. एकाच बाजूने पार्किंग केल्यास एसटीसारख्या मोठ्या वाहनांना मार्ग मिळेल. पर्यटकांना आणि स्थानिक ग्रामस्थांनादेखील त्रास 
होणार नाही.
- अमर सावंत, ग्रामस्थ  

रायगडच्या पायथ्याशी होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे एसटीच्या मार्गात अडथळा येतो. त्यांना हिरकणीवाडी फाट्यापासूनच परतीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना तीन-चार किलोमीटरची पायपीट करावी लागते. 
- संदीप आमगावकर, ग्रामस्थ

रायगड पायथ्यापर्यंतच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार आहे. स्थानिकांशी चर्चा करून आवश्‍यकता निर्माण झाल्यास वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे.
- अरविंद पाटील, पोलिस उपअधीक्षक, महाड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic Jam bottom of Raigad