दुतर्फा पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

वाढती वाहन संख्या आणि अपुरी पार्किंग सुविधा यामुळे नेरूळ, सीवूडस्‌ परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा पार्किंगची समस्या डोके वर काढू लागली आहे.

नवी मुंबई : वाढती वाहन संख्या आणि अपुरी पार्किंग सुविधा यामुळे नेरूळ, सीवूडस्‌ परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा पार्किंगची समस्या डोके वर काढू लागली आहे. या परिसरात अनेक ठिकाणी सम-विषम पार्किंगचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र, बेशिस्त वाहनचालक रस्त्यावर वाटेल, तशी वाहने उभी करत असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. 
नेरूळ रेल्वेस्थानक पश्‍चिमेकडील भाग, राजीव गांधी उड्डाण पूल परिसर, सेक्‍टर ६, साईबाबा हॉटेल सेक्‍टर १०, पालिका आयुक्त निवास सेक्‍टर २१, २३, शिरवणे, सीवूडस्‌ ग्रॅंड सेंट्रल मॉल परिसर, सेक्‍टर ४२, डीमार्ट परिसर सेक्‍टर ४० परिसरात दुतर्फा पार्किंगबरोबरच 'नो पार्कींग'चे फलक लावलेल्या ठिकाणीही बिनदिक्कत वाहने उभी केली जात असल्याचे पहायला मिळते. नेरूळ पूर्वेला आयुक्त निवास परिसरात नो पार्किंगचे फलक असतानाही दुचाकी, चारचाकी वाहने उभी केली जातात. नेरूळ पोलिस ठाण्यापासून हावरे मॉलच्या चौकापर्यंत रस्त्याशेजारी शाळेच्या बस, अवजड वाहने उभी केली जातात. शिरवणेतही अरूंद रस्त्याशेजारी होणाऱ्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागते. एलपी नाका, डी. वाय. पाटील या नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणीही दुतर्फा पार्किंगची समस्या प्रकर्षाने जाणवते; तर नेरूळ पश्‍चिमेला रेल्वेस्थानकाच्या परिसरात दुकानदारांची व ग्राहकांची वाहने दुकानासमोर रस्त्यागत उभी केली जातात. या रेल्वेथानकाच्या परिसरात वाहनतळ असतानाही वाहने रस्त्यावरच उभी करण्यात प्रवासी धन्यता मानतात. त्यामुळे या परिसरातील रस्ते अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत भर पडते. नेरूळ सेक्‍टर ३ जनता मार्केट परिसरात पोस्ट ऑफिस, महावितरणचे कार्यालय, स्टेशनरी दुकाने असल्याने येथेही रस्त्यावर वाहने उभी असलेली आढळतात. कुकशेत, सारसोळे येथेही दुतर्फा पार्किंग आढळते. 

सुविधा नसल्‍याने बेकायदा पार्क
सीवूडस्‌ येथे ग्रॅंड सेंट्रल मॉलमध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध असतानाही मॉलसमोरील रस्त्यावर दुचाकी व चार चाकी वाहने मोठ्या प्रमाणावर उभी केलेली आढळतात. दोन महिन्यांपूर्वी येथे वाहतूक पोलिसांमार्फत कारवाई सुरू करण्यात आली होती. मात्र, ती काही काळच टिकली. 

भाडेकरूंची वाहने रस्‍त्‍यावर
सिडकोने उभारलेल्या गृहसंकुलांमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत भाडेकरूंना वाहने ठेवण्यास मज्जाव करण्यात आल्याने भाडेकरूंची वाहनेही रस्त्याशेजारीच उभी केलेली आढळतात. त्यामुळेही वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडते. अंतर्गत रस्त्यावर गृहसंकुलांसमोर रस्त्याशेजारी दुतर्फा उभ्या असलेल्या या वाहनांमुळे स्कूल बस, एनएमएमटीच्या बसना मार्ग काढणे कठीण जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jam from vehicle parking