सधन समूह आरक्षण मागतात ही शोकांतिका - नितीशकुमार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

मुंबई  - कृषी क्षेत्रावर मोठे संकट आले आहे. महाराष्ट्रातील मराठा, गुजरातमधील पाटीदार आणि उत्तर भारतातील जाट हे सक्षम आणि संपन्न जातीसमूह शेतीऐवजी आरक्षण मागत आहेत, ही मोठी शोकांतिका असल्याची खंत संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज येथे व्यक्त केली.

मुंबई  - कृषी क्षेत्रावर मोठे संकट आले आहे. महाराष्ट्रातील मराठा, गुजरातमधील पाटीदार आणि उत्तर भारतातील जाट हे सक्षम आणि संपन्न जातीसमूह शेतीऐवजी आरक्षण मागत आहेत, ही मोठी शोकांतिका असल्याची खंत संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज येथे व्यक्त केली.

संयुक्त जनता दलाचा महाराष्ट्र प्रदेश मेळावा आज गोरेगाव पूर्व येथील नेस्को मैदानात घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्‌घाटन नितीशकुमार यांच्या हस्ते झाले, या वेळी ते बोलत होते. पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी आमदार कपिल पाटील यांची; तर मुंबईच्या अध्यक्षपदी कामगार नेते शशांक राव यांची निवड त्यांनी जाहीर केली. या वेळी राष्ट्रीय सचिव शाम रजक, माथाडी कामगार युनियनचे अविनाश रामिष्टे, कामगार नेते विश्‍वास उटगी, निवृत्त सनदी अधिकारी जयंत गायकवाड आदी उपस्थित होते.

कृषी मालाला योग्य भाव आणि लागवड खर्चावर 50 टक्के नफा धरून उत्पन्नाला किमान भाव देण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती. तिचा भाजपला विसर पडल्याची टीका नितीशकुमार यांनी केली आणि महाराष्ट्रात समाजवादी विचारधारा रुजली, वाढली आणि आता ती विचारधारा गावागावांत रुजविण्यासाठी पक्षबांधणी करण्याचे आवाहन केले. अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्या तरी बिहारमध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही, असा दावा त्यांनी केला. मुलींचे शिक्षण, कृषी विकास, आरोग्य, पायाभूत सुविधा, दारूबंदी असे धाडसी निर्णय घेऊन बिहारचे महसुली उत्पन्न वाढवले, आता बिहार प्रगतिपथावर असल्याचे ते म्हणाले. धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता, सद्‌भावना आणि बंधुभाव या घटनेच्या मूल्यांवरच देश एकसंध राहू शकेल, असे सांगत जॉर्ज फर्नांडिस, शरद राव; तसेच समाजवादी नेत्यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

नितीशकुमार यांनी बिहारचा विकास केला आहे, आता बिहारमधून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांचे प्रमाण घटले आहे, असे मत कपिल पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title: The tragedy demands intensive group reservation