ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या, ऐरोली- घणसोली स्थानकात थांबाच नाही

ट्रान्स हार्बर मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या, ऐरोली- घणसोली स्थानकात थांबाच नाही

मुंबईः  मध्य रेल्वे प्रशासनाने ट्रान्स हार्बर मार्गावर नव्यानं चार लोकल ट्रेनच्या फेऱ्या सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसरीकडे या विशेष लोकल गाड्यांना ऐरोली आणि घणसोली स्थानकांमध्ये थांबाच देण्यात आला नसल्याने या दोन्ही रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शेजारील रेल्वे स्थानक गाठावे लागत आहे. त्यातच या मार्गावर पूर्वी दोन आणि आता नव्यानं चार अशा केवळ सहा लोकल सकाळ आणि संध्याकाळ या दोन सत्रात धावणार आहे. 

दुपारच्या सत्रात एकही लोकल धावणार नसल्याने दुपारच्या सत्रातील कर्मचाऱ्यांना सार्वजनिक अथवा खासगी वाहनेच प्रवास करावा लागणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे आत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून टाळेबंदीमुळे लोकल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. असे असले तरी राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यास परवानगी दिली. त्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात उपनगरीय लोकल सेवा सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र, ठाणे ते वाशी आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर मध्य रेल्वे प्रशासनातर्फे ठाणे ते वाशीसाठी सकाळी एक आणि सायंकाळी अशा दोनच लोकल सोडण्यात येत होत्या.

या दोन लोकलमुळे ट्रान्स हार्बर मार्गाची लोकल सेवा सुरु असूनही नसल्यासारखी होती. त्यामुळे नवी मुंबई पनवेलमधून ठाणे किंवा मुंबई गाठण्यासाठी किंवा ठाण्याहून नवी मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांना खासगी वाहनांचा आणि  बसचा वापर करावा लागत होता. त्यामुळे कार्यालय गाठण्यासाठी अधिकच वेळ खर्ची पडत होता. त्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार 1 ऑक्टोबरपासून ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेलसाठी चार नव्या फेऱ्या सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

त्यामुळे या मार्गावरील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी या विशेष लोकल गाड्यांना ऐरोली आणि घणसोली स्थानकात थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.  दुपारच्या सत्रात एकही लोकल ट्रेन धावणार नसल्यामुळे फेऱ्या वाढवून उपयोग तरी काय, अशी चर्चा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे. 
 
 ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलचे वेळापत्रक

पनवेल ते ठाणे - सकाळी 7.55 वाजता 
ठाणे ते वाशी - सकाळी 8.40 वाजता
ठाणे ते पनवेल - सकाळी 9.00 वाजता
वाशी ते ठाणे सायंकाळी 4.30 वाजता
पनवेल ते ठाणे - सायंकाळी 5.20 वाजता
पनवेल ते ठाणे - सायंकाळी 6.30 वाजता

-----------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Trans Harbor route trains increased no stops Airoli Ghansoli station

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com