
डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची बदली झाली असून या ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांची नियुक्ती आयुक्तपदी झाली आहे. आयुक्त सूर्यवंशी यांनी अडीच वर्षाचा कालावधी केडीएमसीमध्ये पूर्ण केला असून कोरोना काळात त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या कोरोना काळातील कामगिरीमुळेच कल्याण डोंबिवली महापालिकेला कोव्हीड इनोव्हेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचा स्मार्ट सिटीमध्ये देखील समावेश झाला असून त्या अनुषंगाने शहरात विकास कामे सुरु झालेली आहेत. आयुक्तांच्या कार्यकाळात पालिका हद्दीत प्रशासकीय राजवट लागू झाली. त्या काळातही आयुक्तांनी शहर विकासाच्या दृष्टीने निर्णय घेत विकास कामे सुरु ठेवल्याचे दिसून आले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी करत राज्य सरकारने फेब्रुवारी 2020 मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेची आयुक्त पदाची धुरा आयएएस अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर सोपवली. डॉ. विजय सूर्यवंशी हे 2010 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. शहरातील रखडलेला कचरा प्रकल्प, निधीअभावी खोळंबलेली विकासकामे, शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असलेली पालिका निवडणूक, सर्वोच्च न्यायालयाने बांधकामांवर घातलेली बंदी यांसारख्या गंभीर विषयांवर आयुक्त सूर्यवंशी यांना निर्णय घ्यायचे होते. परंतू कोरोना संसर्गाची लाट आली आणि आयुक्तांसमोर एक वेगळेच आव्हान उभे ठाकले. पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक त्यात शहरातील आरोग्य यंत्रणा कमकुवत होती. ही कमतरता भरुन काढत आजच्या घडीला कल्याण डोंबिवली महापालिकेत एक बळकट अशी आरोग्य यंत्रणा उभी राहीली आहे. कोरोनाच्या अतिकठिण परिस्थितीत संघटीत कामातून आरोग्य यंत्रणा बळकट करणे या उत्कृष्ट कामगिरीमुळेच केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाने 'कोविड इनोव्हेशन पुरस्काराने' पालिकेचा सन्मान केला गेला आहे.
खासगी डॉक्टरांच्या संस्था, वैद्यकिय - सामाजिक संस्थांनी एकत्र येत पालिका प्रशासनास मदत करणे हे एक वेगळे कल्चर पालिका प्रशासनाने तयार केले असून कोरोना नंतरही पालिकेला याचा फायदा झाला तो आयुक्तांच्या कारकिर्दीतच. आधारवाडी डंम्पिंग ग्राऊंड बंद करत घनकचरा विघटन प्रकल्प शहरात राबविणे, शहरातील ठिकठिकाणी असलेल्या कचरा कुंड्या हटविण्यात आल्या. यामुळे अस्वच्छ, बकाल शहर ही ओळख पुसून काढत स्मार्ट सिटीकडे पालिकेने आपली वाटचाल सुरु केली. ओला सुका कचरा वर्गीकरण, शून्य कचरा मोहीम आयुक्तांनी पालिका हद्दीत राबविली. केवळ शहर सुशोभिकरण नाही तर विकास कामांकडेही त्यांनी प्राधान्याने लक्ष दिले. कोपर उड्डाणपूलाचे काम, पत्रीपुलाचं काम नियोजित वेळे आधी पूर्ण केले. वडवली, शहाड येथील पुलाचे काम पालिकेने पूर्ण केले. शहरातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण, आंबिवली येथे जैवविविधता उद्यान उभारले आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात 12 प्रोजेक्ट सुरु आहेत. यामध्ये सिग्लन यंत्रणा, सिसीटिव्ही यांचे काम झाले असून कल्याण डोंबिवलीत कित्येक वर्षानंतर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. अमृत योजनेतही 90 टक्के काम पूर्ण झाल्याने राज्यात पालिका एक नंबरवर गेली.
कोरोना काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण डोंबिवलीतून मुंबईला कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा शहरात प्रवेश देण्यास मनाई करण्याचा आदेश आयुक्तांनी काढला होता. नागरिकांचा रोष पहाता आयुक्तांना हा निर्णय मागे घ्यावा लागला. त्यानंतर दुकानदारांवर बंदी, वेळेचे बंधन घातले गेले तो निर्णय देखील आयुक्तांना मागे घ्यावा लागला होता.
अनधिकृत बांधकामांवर वचक निर्माण करण्यासाठी आयुक्तांनी बांधकामांचे वीज, पाणी तोडणे, पालिकेची हेल्पलाईन क्रमांक जाहीर करणे आदि निर्णय घेतले. अनधिकृत तसेच आरक्षित भूखंडावर केलेल्या बांधकामाविरोधात धडक कारवाईची मोहीम आयुक्तांनी हाती घेतली. परंतू त्यात पूर्णतः यश मिळविण्यात आयुक्तांना यश आले नाही.
पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असताना थकीत मालमत्ता धारकांकडून वसुली करत, ऑनलाईन कर भरणेची सुविधा उपलब्ध करुन देत कोरोना काळातही पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्याकडे आयुक्तांनी विशेष लक्ष दिले होते.
पालिका आयुक्त सूर्यवंशी यांच्या कार्यकाळात पालिका हद्दीत प्रशासकीय राजवट लागू झाली. आयुक्तांनी या काळात विकास कामांच्या दृष्टीने निर्णय घेत कामे सुरु ठेवली. यावेळी कचरा प्रश्न, रस्त्यांची कामे, कचरा उप विधी कर यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठवली गेली. परंतू त्यांनी आपले निर्णय बदलले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.