पारदर्शकता, सुशासनावरून शिवसेना-भाजपची जुंपणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी पारदर्शकता आणि सुशासन या मुद्द्यांवर भाजप भर देणार असून, त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवसेना नेत्यांनी गृहपाठ सुरू केल्याची माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने दिली

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला लक्ष्य करण्यासाठी पारदर्शकता आणि सुशासन या मुद्द्यांवर भाजप भर देणार असून, त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी शिवसेना नेत्यांनी गृहपाठ सुरू केल्याची माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने दिली

मुंबई महापालिकेतील गैरव्यवहार, ठेकेदार, रस्त्यांवरील खड्डे यावरून भाजप प्रचारात शिवसेनेला जेरीस आणणार आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी तर शिवसेनेच्या महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढा मुंबईकरांसमोर वाचण्यासाठी "भ्रष्टाचाराची काळी पत्रिका' प्रसिद्ध करणार असल्याचे जाहीर केले आहे. सोमय्या यांनी यापूर्वीच मुंबई महापालिका भ्रष्टाचाराची पाळेमुळे वांद्य्राच्या साहेबापर्यंत पोचली असल्याचे विधान करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे शिवसेनेला रोखायचे असेल, तर महापालिका भ्रष्टाचाराचाच मुद्दा बाहेर काढणे हीच भाजपची रणनीती असल्याचे सांगितले जाते. शिवसेना-भाजप युतीची चर्चा सुरू असताना भाजपच्या नेत्यांनी याची चुणूक दाखवली होती. मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशिष शेलार आणि खासदार किरीट सोमया सातत्याने याबाबत विधाने करत होते. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत, तसेच आमदार अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले होते. याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली होती.

आता युती संपुष्टात आल्याने दोन्ही पक्षांनी आपले प्रचाराचे मुद्दे जुळविण्यास सुरवात केली आहे. प्रचाराच्या सभेत आणि सोशल मीडियावर पारदर्शकतेच्या मुद्द्यावर शिवसेनेला खिंडीत पकडण्याची रणनीती भाजप आखत आहे. भाजपच्या या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना नेत्यांनीही कंबर कसली असून, शिवसेनेच्या वॉर रूममध्ये त्याची तयारी सुरू असल्याची माहिती शिवसेना भवनातून देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transparency, better governance from the BJP-Shiv Sena