ठाणे सॅटीसखाली वाहतुकीला लागणार शिस्त 

ठाणे : सॅटीस पुलाखाली उभारण्यात आलेली पोलिस चौकी (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
ठाणे : सॅटीस पुलाखाली उभारण्यात आलेली पोलिस चौकी (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटीस पुलाखाली दोन वर्षांपूर्वी (ऑक्‍टोबर 2017) हटवण्यात आलेली वाहतूक नियंत्रण चौकी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पुन्हा उभारण्यात आली आहे. त्यामुळे सॅटीस पुलाखालील रिक्षाचालकांच्या मुजोरीसह बेकायदा वाहतुकीला शिस्त लागणार आहे. दरम्यान, या वाहतूक चौकीमधून कारभार हाकण्यास सुरुवात झाल्यानंतर येत्या काळात सॅटीसखालील सीसी टीव्ही कॅमेऱ्याची कंट्रोल रूमदेखील येथेच कार्यरत करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली. 

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तसेच, वाहतुकीचे योग्य नियमन व्हावे यासाठी ठाणे महापालिकेने सॅटीस प्रकल्प उभारला. त्यानुसार, सॅटीस पुलावर टीएमटी बसचा थांबा आणि राज्य परिवहन बसना मार्गिका उपलब्ध करून देण्यात आली. तर, पुलाखाली रिक्षा-टॅक्‍सी आणि दुचाकीसह खासगी वाहनांना मुभा देण्यात आली.

मात्र, सॅटीसखाली मुजोर रिक्षाचालक आणि दुचाकींची अनधिकृत पार्किंग होत असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. मध्यंतरी वाहतुकीच्या या समस्येविरोधात तसेच, रिक्षाचालकांच्या मुजोरीविरोधात शिवसेना खासदार राजन विचारे यांनीही आवाज उठवला होता. त्यानंतर काही दिवस सुरळीत वाहतूक दिसली. 

मात्र, "पुन्हा ये रे माझ्या मागल्या'प्रमाणे सॅटीसखाली कोंडी सुरूच आहे. या कोंडीला आणि वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक शाखेने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सॅटीसखाली पुन्हा वाहतूक नियंत्रण चौकी उभारली आहे. तसेच, नो पार्किंग क्षेत्र घोषित केले आहे. ठाणे नगर पोलिस ठाण्यांतर्गत वाहतूक शाखेची उपशाखा म्हणून ही चौकी कार्यरत होणार आहे.

त्यामुळे सॅटीसखाली होणारी वाहतूक कोंडी टळणार असून रिक्षाचालकांच्या मनमानीला चाप बसणार आहे. किंबहुना, सॅटीसखाली बसवण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण हाताळणे सुलभ होणार असल्याने स्थानक परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसेल, असा आशावाद पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. 

ठाणे स्थानक परिसरातील वाढत्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सॅटीस पुलाखालील ठाणे नगर वाहतूक उपशाखेची चौकी उभारण्यासाठी गेले अनेक दिवस ठाणे महापालिकेकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या माध्यमातून पालिकेने चौकी उभारली असून लवकरच येथून वाहतूक शाखेचा कारभार हाकला जाणार आहे. 
- कवियत्री गावित 
वाहतूक शाखा अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com