#transportissues वांद्र्यात पदपथावरून रिक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मुंबई - मुंबईच्या प्रत्येक शहरात रिक्षाचालकांच्या मुजोरीची चर्चा रोजच रंगलेली असते. वांद्र्यात तर मुजोर रिक्षाचालकांना आवर घालणे वाहतूक पोलिसांनाही जड जात असल्याचे चित्र आहे. प्रवाशांचा जीव धोक्‍यात घालून रिक्षाचालक चक्क पदपथावरून रिक्षा दामटत आहेत. पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेऊन काहीही कारवाई करत नसल्याने त्यांचे फावले आहे. 

मुंबई - मुंबईच्या प्रत्येक शहरात रिक्षाचालकांच्या मुजोरीची चर्चा रोजच रंगलेली असते. वांद्र्यात तर मुजोर रिक्षाचालकांना आवर घालणे वाहतूक पोलिसांनाही जड जात असल्याचे चित्र आहे. प्रवाशांचा जीव धोक्‍यात घालून रिक्षाचालक चक्क पदपथावरून रिक्षा दामटत आहेत. पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेऊन काहीही कारवाई करत नसल्याने त्यांचे फावले आहे. 

गेल्याच आठवड्यात रिक्षा उलटून एक प्रवासी गंभीर जखमी झाला असतानाही पुन्हा मुजोर रिक्षाचालक पदपथावरून रिक्षा चालवत आहेत. विशेष म्हणजे परिवहन विभागाचे मुख्यालय हाकेच्या अंतरावर आहे. तरीही त्यांची मुजोरी सुरूच आहे. राज्याचे परिवहन विभाग कार्यालय असलेल्या वांद्र्यात रिक्षावाल्यांची अरेरावी वाढली आहे. वांद्रे रेल्वेस्थानकावरून अवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडे परिवहन विभागच ‘अर्थपूर्ण’ कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. 

परिवहन आयुक्तालयाच्या नाकाखाली वांद्रे स्थानकाबाहेर रिक्षावाल्यांची मुजोरी अशा मथळ्याखाली ‘सकाळ’ने २२ जुलै रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची तत्काळ दखल घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. गैरप्रकाराविरोधात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश रावते यांनी दिले होते. परिणामी परिवहन अधिकाऱ्यांनी केलेल्या कागदपत्रांच्या तपासणीत २४ रिक्षा बेकायदा विनामीटर प्रवासी वाहतूक करत असल्याचे लक्षात आले होते. त्या रिक्षांवर तत्काळ कारवाई करण्यात आली आहे; मात्र त्यानंतरही रिक्षावाल्यांचे ‘ये रे माझ्या मागल्या...’ सुरूच असून त्यांनी आपली दादागिरी सुरूच ठेवली आहे.

वांद्रे रेल्वेस्थानकाबाहेरून रिक्षा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या ठिकाणी फक्त शेअर रिक्षाच मिळतात. मीटरने येण्यासाठी एकही रिक्षावाला तयार होत नाही. बाहेरच्या रिक्षावाल्याने मीटरने प्रवासी घेतल्यास स्थानिक रिक्षावाले त्याला मारायला धावतात. काही रिक्षा चक्क पदपथावरून दामटवल्या जातात. रिक्षावाल्यांच्या दादागिरीमुळे स्थानिक नागरिक जीव मुठीत घेऊनच प्रवास करत असल्याचे चित्र आहे.

‘सकाळ’च्या बातमीची दखल घेऊन आम्ही वांद्रे भागात मीटर तपासणी सुरू केली आहे. पदपथावरून रिक्षा चालवणे म्हणजे गंभीर प्रकार आहे. त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांना तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.
- शेखर चन्ने, आयुक्त, परिवहन विभाग

Web Title: transport issues in mumbai Rickshaw on the footpath