गुंता सुटेना; संप काही मिटेना...

वसई ः कामगारांशी चर्चा करताना विवेक पंडित.
वसई ः कामगारांशी चर्चा करताना विवेक पंडित.

वसई ः वसई-विरार महापालिकेने परिवहन सेवा दिलेल्या ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे आमचे हाल होत आहेत. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत, यासाठी पालिकेने हस्तक्षेप करावा, अशी भूमिका घेत कामगारांचा संप तिसऱ्या दिवशीदेखील सुरू होता. आगारातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आल्याने कार्यालयाला टाळे लागले. संपामुळे लाखो प्रवाशांची मात्र दैना उडाली. यात मध्यस्थी करण्यासाठी विवेक पंडित यांनी कामगारांची भेट घेत त्यांची पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतरही तिढा कायम आहे.

तिसऱ्या दिवशी वसई पूर्वेकडील परिवहन बसच्या आगारात दुपारी १२ वाजता माजी आमदार; तसेच श्रमजीवी कामगार रयत संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी भेट देत कामगारांच्या प्रश्‍नांवर चर्चा केली. आमदार हितेंद्र ठाकूर, महापौर प्रवीण शेट्टी व परिवहन सभापती प्रीतेश पाटील यांच्याशी कामगारांच्या समस्यांबाबत ठेकेदाराची असलेली भूमिका या संदर्भात त्यांनी चर्चा केली. 

कामगार आयुक्त, नगरविकास; तसेच सरकारदरबारी कामगारांच्या प्रश्‍नांबाबत पाठपुरावा केला आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ज्या प्रकारे वेतन होते; तसेच परिवहन कामगारांना देण्यात यावे, अशी भूमिका मांडली आहे. उच्च न्यायालयात देखील दाद मागितली असून येत्या ३० जानेवारीला निकाल येणार आहे. ठेकेदारावर अंकुश ठेवण्याचे काम महापालिकेचे आहे. कामगारांवर अन्याय होता कामा नये, याकडे जबाबदारीने लक्ष घालावे, असेही पंडित यांनी या वेळी सांगितले; परंतु कामगार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. गुंता सोडवा, तरच मार्गावर बस धावतील, असे त्यांनी सांगितले. 

कामगारांना घेऊन विवेक पंडित यांनी थेट महापालिकेचे मुख्यालय गाठले आणि चर्चा घडवून आणली. या वेळी कामगार, परिवहन समितीचे सदस्य, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, भगीरथ ट्रान्सपोर्टचे संचालक उपस्थित होते. कामगारांच्या मागण्या आणि त्यावर ठोस कार्यवाही झाल्याशिवाय पालिका कार्यालयातून जाणार नाही, अशी भूमिकाच घेण्यात आली होती; मात्र सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चर्चेतून कोणताच तोडगा निघाला नाही.

प्रवाशांची दैना
वसई-विरार शहरातील विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, नोकरदारवर्ग हे एसटी बंद असल्याने वसई-विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवेतून प्रवास करत असतात; परंतु गेले तीन दिवस ही सेवा ठप्प आहे. त्यामुळे त्यांची दैना उडाली आहे.

पालिकेने मागितली आजपर्यंतची मुदत
महापालिकेत तब्बल तीन तासाहून अधिक वेळ झालेल्या चर्चेअंती महापालिकेने शनिवारपर्यंतची (ता.१८) मुदत मागितली. त्यामुळे संप सुरूच आहे.ठेकेदाराची जबाबदारी महापालिकेने घेऊन तसे पत्र द्यावे, अशी कामगारांनी यावेळी मागणी केली आहे.

कामगारांच्या प्रश्नांबाबत आमदार हितेंद्र ठाकूर, महापौर प्रवीण शेट्टी यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी कामगारांबाबत सकारात्मक बाजू मांडली आहे. कामगारांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. 
विवेक पंडित, अध्यक्ष, श्रमजीवी कामगार रयत संघटना

कामगारांच्या समस्यांबाबत परिवहन सेवेच्या ठेकेदारासोबत बोलणे झाले आहे. त्यांना वेळेवर वेतन द्यावे, उर्वरित मागण्या पूर्ण कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. कामगारांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल. 
प्रीतेश पाटील, सभापती, परिवहन समिती, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com