नवी मुंबईतील कचराकुंडीमुक्त योजना फसली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

नवी मुंबई शहराला कचराकुंडीमुक्त शहर करण्याचे प्रशासनाचे स्वप्न भंगले आहे. नोकरदार वर्गातील कुटुंबाकडून, गावठाणातील चाळी, झोपडपट्टीतील कचरा रस्त्यावर टाकला जात आहे. 

नवी मुंबई : संत गाडगेबाबा स्वच्छता मोहीम योजनेपासून ते स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेपर्यंत स्वच्छतेत देशात अव्वल ठरलेल्या नवी मुंबई शहराला कचराकुंडीमुक्त शहर करण्याचे प्रशासनाचे स्वप्न भंगले आहे. नोकरदार वर्गातील कुटुंब, गावठाणातील चाळींमध्ये राहणारे भाडेकरू, झोपडपट्टीतील रहिवाशांची संख्या यांच्या कामांच्या वेळा निश्‍चित नसल्यामुळे ठराविक वेळेत कचरा गोळा करणारी गाडी फिरवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न फोल ठरले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणांहून काढलेल्या कुंड्या कचरा गोळा करण्यासाठी प्रशासनाला पुन्हा आहे त्याच ठिकाणी ‘जैसे थे’ ठेवाव्या लागल्या आहेत. 

शहरात कचरा गोळा करण्यासाठी रस्त्याच्या कडेला अथवा पदपथावर लोखंडी अथवा फायबरच्या कचराकुंड्या ठेवलेल्या असतात. नागरिकांकडून कचरा थेट कुंड्यांमध्ये न टाकता बाहेर टाकला जात असल्याने रस्त्यावर कचरा पडतो. अन्नाच्या शोधात असलेल्या भटक्‍या प्राण्यांकडून हा कचरा अस्ताव्यस्त केला जातो; तर अनेकदा कुंड्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कचरा टाकल्यामुळे कुंड्या भरगच्च भरलेल्या दिसतात. शहरातील कचऱ्याचे हे दृश्‍य कायमचे घालवण्यासाठी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कचराकुंडीमुक्त शहर अशी योजना आणली होती. त्यानंतर आलेले आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनीही तीच री ओढली होती. इंदूर, बंगळूर या शहरांमध्ये ही योजना यशस्वीरीत्या राबवली गेली आहे. 

महापालिकेनेही अनेक नोडमधून रस्ते, मुख्य चौक, पदपथांवरील कचराकुंड्या गायब केल्या. तसेच कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या वाहनातच घरातील कचरा टाकण्याची विनंती नागरिकांना केली; परंतु अचानक कचराकुंड्या काढून टाकल्यामुळे नागरिकांना काही कळेनासे झाले. नवी मुंबईत राहणारी बहुतांश कुटुंबे ही नोकरवर्ग असल्यामुळे कामाच्या वेळा व कचरा गोळा करणारी येणारी गाडीच्या वेळा जुळत नसल्याने घरातील कचरा फेकण्यासाठी रस्त्यावरील कुंड्यांची गरज असल्याचे काही नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. गावठाणे व झोपडपट्टी भागात काही जणांकडून रस्त्यावर कुंडी असलेल्या जागेवर कचरा फेकला जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. कुंड्या काढून टाकल्यामुळे काही नागरिकांनी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मदतीने विभाग कार्यालयांवर मोर्चे काढून जाबही विचारला. कचरा गोळा करणाऱ्या गाडीच्या वेळेतच कचरा टाकायचा. ही नागरिकांनाच शिस्त नसल्यामुळे महापालिकेचे कचराकुंडीमुक्त शहराचे प्रयत्न फोल ठरले आहे. 

दृष्टिक्षेप 
     शहरात पाचशे किलो क्षमतेच्या ३०० कुंड्या आहेत.
     १२० ते २४० किलो क्षमतेच्या सुमारे १४ हजार कुंड्या रहिवासी सोसायट्यांना देण्यात आल्या आहेत.
     कुंड्यांमधून दैनंदिन सरासरी ७०० ते ७५० मेट्रिक टन कचरा गोळा होतो
     ७ कॉम्पॅक्‍टर व ५० टिप्पर असे १२० वाहनांमधून कचरा गोळा केला जातो.

भूमिगत कचराकुंडींचा पर्याय 
कचरा कुंडीमुक्त शहर तयार करण्यासाठी महापालिकेने रस्ते, पदपथ व मुख्य चौकातील कुंड्यांच्या जागेवर भूमिगत कचराकुंड्या बसवण्याचा नवा पर्याय सुचवला आहे. वाशी, नेरूळ, सीबीडी-बेलापूर आदी महत्त्वाच्या ठिकाणी रेल्वेस्थानकांच्या परिसरात या भूमिगत कचराकुंड्या उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trash-free scheme not worked in navi mumbai