कर्जत-कल्याण रस्त्यावर झाडे कोसळल्‍याने वाहतुकीवर परिणाम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

कर्जत-कल्याण रस्त्यावर दरड आणि झाड कोसळल्यामुळे या राज्यमार्ग रस्त्यावरील एक मार्गिका बंद होती.

मुंबई : कर्जत तालुक्‍यात गेले दोन दिवस संततधारेने पूरस्थिती निर्माण केली होती. सलग तिसऱ्या दिवशी नेरळ-माथेरान घाटात झाडे आणि दरडी कोसळल्या आहेत. त्याप्रमाणे आज सकाळी कर्जत-कल्याण रस्त्यावर दरड आणि झाड कोसळल्यामुळे या राज्यमार्ग रस्त्यावरील एक मार्गिका बंद होती.

२४ तासांत कर्जत तालुक्‍यात मिळून साधारण ४०० मिलिमीटर पाऊस झाला होता. साधारण सर्व भागांत होत असलेल्या पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. आज दुपारी घाटातील नांगरखिंड भागात दरड कोसळले. त्या झाडासोबत मोठ्या प्रमाणात माती खाली आल्याने घाटातील वाहतूक मंदावली होती; मात्र नेरळ-माथेरान टॅक्‍सी संघटनेचे वाहनचालकांनी झाड रस्त्यावरून बाजूला करण्यास सुरुवात केली. त्यानंतर  बांधकाम विभागाने जेसीबी मशीन पाठवले. तेथे नेरळ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र शेडगे हे वाहतूक नियंत्रण करीत होते.

कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर पंचवटी येथे रस्त्यावर दरड कोसळणार म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने शनिवारी बंद ठेवला होता; मात्र रविवारी सकाळी बंद ठेवलेल्या रस्त्यावर दरड कोसळली. त्या वेळी तेथे रस्त्यावर कोसळलेले झाड मोठे असल्याने तेथील रस्त्याच्या दोन्ही लेन झाकल्या गेल्या.  नेरळ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रतीलाल तडवी यांनी दोन्ही बाजूची वाहतूक एका बाजूने वळवून कोणताही अपघात होणार नाही याची काळजी घेतली. दुपारी बांधकाम विभागाचे उपअभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी तेथे स्वतः उभे राहून जेसीबी मशीनच्या साह्याने रस्त्यावरील दरड बाजूला केली. त्यानंतर दीड दिवसापासून बंद असलेला रस्त्याचा भाग आज सायंकाळी सुरू केला. त्यामुळे धीमी झालेली वाहतूक कोंडी पूर्ववत झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree Collapse on Karjat-kalyan Road