esakal | सावित्री ज्योती मालिका बंद, ऐतिहासिक मालिकांना सरकारने अनुदान द्यावे, हरी नरके यांचं मत
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्री ज्योती मालिका बंद, ऐतिहासिक मालिकांना सरकारने अनुदान द्यावे, हरी नरके यांचं मत

मालिकांना सरकारने चित्रपटाच्या धर्तीवर अनुदान देणे आवश्यक आहे, असे मत असे या मालिकेचे संशोधक सल्लागार  प्रा. हरी नरके यांनी मांडले आहे.

सावित्री ज्योती मालिका बंद, ऐतिहासिक मालिकांना सरकारने अनुदान द्यावे, हरी नरके यांचं मत

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई:  सोनी मराठीवर सुरू असलेली सावित्री ज्योती ही सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील मालिकेला टीआरपी न मिळाल्यामुळे ती बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे.  येत्या शनिवारी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. या निर्णयामुळे टीव्ही इंडस्ट्री, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. जगण्याची उमेद देणाऱ्या मालिका बंद झाल्यास, महापुरुषांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत कसा पोहोचणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अशा मालिकांना सरकारने चित्रपटाच्या धर्तीवर अनुदान देणे आवश्यक आहे, असे मत असे या मालिकेचे संशोधक सल्लागार  प्रा. हरी नरके यांनी मांडले आहे.

यावर्षाच्या सुरुवातीला सावित्री ज्योती ही मालिका सोनी मराठीवर सुरू झाली. या मालिकेत ओंकार गोवर्धनने जोतिबा फुले आणि अभिनेत्री अश्विनी कासारने सावित्रीबाई फुले यांची व्यक्तिरेखा साकारली. या दोन्ही कलाकारांच्या अभिनयाचे सगळीकडे खूप कौतुक झाले. मात्र आता या मालिकेला टीआरपी नसल्याचे सांगण्यात आले आणि ती बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे.

याबाबत अभिनेते अरुण नलावडे म्हणाले की,  दहा मालिकांमध्ये एखादी मालिका टीआरपीमध्ये कमजोर ठरू शकते. मात्र टीआरपी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा ऐतिहासिक मालिका टीआरपी नाही म्हणून बंद झाली तर आपला इतिहास आजच्या पिढीला समजणार कसा? आपल्याकडे अनेक महापुरुष होऊन गेले. त्यांचा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

ही मालिका बंद होत आहे ही दुर्देवी बाब आहे. मात्र वाहिनीने अशा प्रकारची मालिका आणण्याचे एक धाडस केले ही बाबही दुर्लक्षित करता येणार नाही. उलट प्रेक्षकांनी अशा मालिकांचे चांगले स्वागत केले पाहिजे, अशा मालिका त्यांनी पाहिल्या पाहिजेत, असं अभिनेत्री निशिगंधा वाड म्हणाल्यात.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अभिनेत्री प्रिया बेर्डे म्हणाल्या की,  वाहिनीची टीआरपीची गणिते खूप वेगळी असतात. कधी कधी चालणारी मालिकादेखील बंद होते. आता ही मालिका बंद होतेय ही दुर्दैवी बाब आहे. अशा ऐतिहासिक मालिका चालल्या पाहिजेत आणि नवीन यायला देखील हव्यात.

हा फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, असं आपण म्हणतो. आपले राज्य प्रगत राज्य आहे. आपल्याकडे टीव्हीचा  प्रेक्षक वर्ग मुख्यतः बहुजन समाज आणि महिला आहेत. त्यांनी या मालिकेकडे दुर्लक्ष करावे हे बेफिकीरीचे आहे, समाजद्रोह आहे. ही मालिका गुणवत्तेत अव्वल होती. टीआरपी अभावी अशा मालिका  बंद पडत असतील तर या जॉनरच्या मालिका करण्याचे धाडस कुणी दाखवणार नाही, असे या मालिकेचे संशोधक सल्लागार  प्रा. हरी नरके यांनी म्हटले आहे. यासोबत या समाजप्रबोधन, लोकशिक्षण देणाऱ्या मालिका असल्यामुळे राज्य सरकारने सामाजिक चित्रपटाच्या धर्तीवर या मालिकेला अनुदान देण्याचा विचार केला पाहिजे, अशी मागणी श्री. नरके यांनी केली.

हेही वाचा- बाराच्या ठोक्याला नाही, यंदा नववर्षाचे स्वागत रात्री साडे दहा वाजताच

सावित्रीबाई या सर्वसाधारण महिला होत्या, त्याच पडद्यावरही त्याच पद्धतीनं दाखवल्या गेल्या, त्यामध्ये ग्लॅमर नाही. सावित्रीबाईंनी स्त्रीशिक्षणाचे महत्वाचे काम केले. मात्र या पिढीला त्यांचे कार्य बघून स्वतःमध्ये कुठलेच बदल करुन घ्यायचा नाही. सर्वांना वरवरच्या गोष्टी, दिखाऊपणात इंटरेस्ट आहे. कुणालाच बदलायचे नाही. त्यामुळे अशा मालिका बघण्याची मानसिकता या पिढीची नाही, असं मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विभावरी पाटील यांचे म्हणणे आहे.

शंभर भाग शिल्लक

या मालिकेत आतापर्यंत केवळ जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंचे शैक्षणिक योगदान दाखवले गेले होते. त्यांचे पुढचे 40 वर्षाचे जीवन दाखवायचे होते. त्यासाठी जवळपास 100 एपिसोड करायचे होते. मात्र टीआरपी घसरल्यामुळे मालिका बंद करण्याची वेळ आली आहे असेही नरके म्हणाले.

----------------------

(संपादन- पूजा विचारे)

TRP issue Savitri Jyoti Serial Stopped Historical series should be subsidized government Hari Narke