मुंढेंवरील ठराव मुख्यमंत्र्यांनीच फ्रिझ केला - गणेश नाईक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

कोपरखैरणे - आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सध्याचे मुख्यमंत्रीच राजकारण खेळण्यामध्ये हुशार आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्‍वास ठरावामध्ये मुख्यमंत्र्यांनी थर्ड अंपायरची भूमिका घेतली आहे. त्यांनीच हा ठरावच फ्रिझ केला असल्याची टीका माजी मंत्री गणेश नाईक यांनी केली.

कोपरखैरणे - आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सध्याचे मुख्यमंत्रीच राजकारण खेळण्यामध्ये हुशार आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्‍वास ठरावामध्ये मुख्यमंत्र्यांनी थर्ड अंपायरची भूमिका घेतली आहे. त्यांनीच हा ठरावच फ्रिझ केला असल्याची टीका माजी मंत्री गणेश नाईक यांनी केली.

कोपरखैरणे येथे आज श्रमिक शिक्षण मंडळ बोनकोडे आणि नवी मुंबई शिक्षण संकुल आयोजित सराव परीक्षेचे उद्‌घाटन माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी आपल्या भाषणात शिक्षण आणि सराव परीक्षेचे महत्त्व सांगत असतानाच नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरही नाव न घेता टीका केली.

छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा आपले कार्य सिद्धीसाठी विचारविनियम करून निर्णय घेत होते. आता मात्र असे होत नाही. गाव, तालुका, जिल्हा, शहर ते राज्यस्तराच्या पातळीवर हिटलरशाही सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेवर आधारित राज्यकारभार चालणे गरजेचे असून हुकूमशाहीचा अंत चांगला होत नाही. अशी टीका त्यांनी केली. नवी मुंबई शहर हे केवळ अद्ययावत वा स्वच्छतेचे शहर वगैरे म्हणून ओळखले जात नसून माणुसकी जपणारे लोक म्हणून ओळखले जाते, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी आयुक्तांच्या स्वच्छता मोहिमेवर केली.

कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांच्या भाषणाचा संदर्भ घेत आयुक्तांवरील अविश्वास ठरावाबाबत विचारले असता त्यांनी, मुख्यमंत्री हे हुशार आहेत; ते थर्ड अम्पायर आहेत. त्यांचा कॅमेरा अजून सेट झाला नाही. बहुतेक अँगल चेक करताहेत. तो डीपफ्रीजमध्ये टाकल्याचे उत्तर नाईक यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी एक तर ठराव फेटाळायला हवा किंवा स्वीकारायला हवा होता. त्यांनी तो स्थगित ठेवला आहे. आजवरच्या सर्व मुख्यमंत्र्यांत हे मुख्यमंत्री राजकारण खेळण्यात सर्वात हुशार आहेत, अशी मिश्‍कील टीकाही त्यांनी केली.

या वेळी महापौर सुधाकर सोनावणे, आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई अध्यक्ष अनंत सुतार, नगरसेवक व रा. फ. नाईक शाळेचा शिक्षकवृंद उपस्थित होता.

बावीस केंद्रांवर सराव परीक्षा
सराव परीक्षेचे हे दहावे वर्ष आहे. या वर्षी 22 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. ज्यात दहावीचे तब्बल दहा हजार सहाशे विद्यार्थी सहभाग घेणार आहेत.

Web Title: tukaram mundhe resolution by chief minister