वादकांविना हरपणार ‘तारपा’चे दमदार सूर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

विरार ः काळाच्या ओघात अनेक वाद्ये, त्यांचे संगीत कमी होऊ लागले असून आदिवासींचे प्रसिद्ध तारपा हे वाद्य काळाच्या ओघात मागे पडत आहे. हे वाद्य वाजवणारे कलाकार कमी होऊ लागल्याने तारपाचे सूर हरपण्याची भीती व्यक्त होत आहे.

विरार ः काळाच्या ओघात अनेक वाद्ये, त्यांचे संगीत कमी होऊ लागले असून आदिवासींचे प्रसिद्ध तारपा हे वाद्य काळाच्या ओघात मागे पडत आहे. हे वाद्य वाजवणारे कलाकार कमी होऊ लागल्याने तारपाचे सूर हरपण्याची भीती व्यक्त होत आहे.

तारपा नृत्य आदिवासींच्या समृद्ध सांस्कृतिक लोकसंस्कृतीचे कोंदण आहे. त्यामुळेच तारपा नृत्याचा वारसा हा प्रत्येक श्‍वासातून समूहमनाचा ठेका घेताना दिसतो. तारपा हे खास गावरान बाज घेऊन जन्माला आलेले वैशिष्ट्यपूर्ण वाद्य आहे; मात्र आता तारपावादकांची संख्या घटू लागल्याने भविष्यात त्यांचे सूर हरवण्याची चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान तारप्याचे सूर यापुढेही कायम राहावेत, यासाठी श्रमजीवी संघटना पुढाकार घेणार आहे. 

आदिवासी समाज उत्सवप्रिय आहे. तसेच या समाजात नृत्यालाही फार मोठे स्थान आहे. निसर्गपूजक आदिवासी समाजात होळी, बारस, नवीन आलेले पीक, नवीन भाताची लागवड, प्रत्येक प्रसंगाच्या उत्सवात तारपा नृत्याचा ठेका धरला जातो. दिवसभर काम करून थकलेल्या आदिवासींमध्ये तारप्याचा सूर ऐकल्यानंतर उत्साह, नृत्याचा नाद संचारतो. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत याचा ताल धरला जातो. हातात हात, गोफ गुंडाळून गोल रिंगण, ताल, लय आणि सुरावटीवर हे सामूहिक नृत्य केले जाते.

तारपा वाजवणारे या वाद्यात मोठ्या ताकदीने फुंकर मारून विविध प्रकारच्या नृत्यासाठी विविध सूर काढतात. तारपा नृत्य रात्री खूप वेळपर्यंत चालत असल्याने तारपावादकाची दमछाक होण्याची दाट शक्‍यता असते; मात्र हे कलाकार आव्हान पेलण्यात सराईत असतात. तारपावादकांची जुनी पिढी आता वयोवृद्ध झाली आहे. नव्या पिढीचे, ताज्या दमाचे कलाकार मात्र तयार होताना दिसत नसल्यामुळे तारपाचे दमदार स्वर हरपण्याची भीती व्यक्त होत आहे. 

तारपा वाद्य अन्‌ नृत्यांची रंगत
लांब भोपळा सुकवून बांबूच्या नळ्या, ताडाच्या झावळ्या आणि मेण वापरून हे वाद्य तयार केले जाते. या वाद्यांचा दमदार ध्वनी, निसर्गाशी नाते सांगणारे पोशाख आणि एकमेकांच्या कमरेत हात गुंफून, फेर धरून, नृत्यात मग्न झालेले रांगडे आदिवासी हा तारपा नृत्याचा बाज आज लोककलेच्या कार्यक्रमांमधून आणि वारली चित्रकलेच्या माध्यमातून सर्वांना परिचित आहे. हे नृत्य करण्याची एक खास पद्धत आहे. स्त्री-पुरुष एकामागोमाग उभे राहून एकमेकांच्या कमरेत हात गुंफून फेर धरतात. घोल काठी आणि तारपा वाद्य वाजवणारे कलाकार वर्तुळाच्या मधोमध उभे राहतात. 

आदिवासींची बरीच नृत्ये आहेत; पण तारपा जास्त प्रसिद्ध आहे; परंतु त्याचा वारसा टिकवणे आवश्‍यक आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन होण्यासाठी नवीन तारपावादक तयार होणे गरजेचे आहे.
वसंत भसरा, आदिवासी अभ्यासक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tune of 'tarpa' harms without new tarpa artists in Palghar