तुर्भे सरकारी वसाहतीची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

वसाहतीमधील समस्येबाबत बांधकाम विभागाच्या ठाणे कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. अतिशय बिकट परिस्थितीत येथे राहावे लागते. समस्या भरपूर असल्याने संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन वसाहत समस्यामुक्त करावी.
- अशोक कांबळे,  रहिवासी

तुर्भे - तुर्भे येथील बैठ्या सरकारी वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या या पडक्‍या घरांमध्ये राहायचे कसे, असा प्रश्‍न कामगारांना पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वसाहतींकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे.

सायन-पनवेल रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तुर्भे येथे ३० क्वॉर्टर्स होत्या. त्यातल्या रिकाम्या आहेत. उरलेल्या घरांना कोणत्याच सोई-सुविधा नाहीत. वसाहतीत घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. येथे काही दिवस घंटागाडी येत नाहीत. त्यामुळे वसाहतीत कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. पिण्याचे पाणी पुरेसे आणि वेळेवर मिळत नाही. वसाहतीमधील विजेचे दिवे बंद असल्यामुळे रात्री तेथे अंधाराचे साम्राज्य पसरते.

अनेक वर्षांपासून येथील घरांची डागडुजी केलेली नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा तक्रार केली, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही, असे येथील रहिवाशांनी सांगितले. येथे सर्वांत मोठी समस्या आहे ती पाण्याची. त्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. या ठिकाणी दोन बोअरवेल आहेत. एक इलेक्‍ट्रिक व दुसरी हातपंपाची आहे. या वसाहतीत दरवर्षी जानेवारी ते जून या पाचसहा महिन्यांत पाणीटंचाई असते. या वसाहतीला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होतो. तो अतिशय कमी दाबाने होत असल्यामुळे पाण्यासाठी महिलांना रात्र रात्र जागावे लागते. वसाहतीमधील पथदिवे बंद असल्यामुळे रात्री उशिरा घरी परतताना महिलांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अंधारामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. इमारतींच्या ड्रेनेज पाईपलाईनमध्ये उंदीर-घुशींनी घर केल्याने त्या तुंबतात. त्यामुळे ड्रेनेजचे पाणी वसाहतीत पसरून दुर्गंधी पसरते. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

पाच दशकांपूर्वीचे बांधकाम
१९६५ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने ही वसाहत बांधली आहे. तेव्हापासून या वसाहतीची देखभाल व दुरुस्ती केली नसल्यामुळे येथील अनेक घरांच्या भिंती जीर्ण झाल्या आहेत. खिडक्‍या तुटल्या आहेत. दरवाजे खराब झाले आहेत. वसाहतीचे फाटक तुटले आहे. येथील रस्त्यांचे १५ वर्षांपूर्वी डांबरीकरण केले होते. ते रस्ते आता पूर्ण खराब झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात येथील रहिवाशांना चिखलातून वाट काढावी लागते. वसाहतीत उंदीर-घुशी मरून पडलेल्या असतात. त्यामुळे असह्य दुर्गंधी पसरते. आता पावसाळा जवळ आल्यामुळे येथे दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या वसाहतीची दुरुस्ती करण्याची मागणी कामगारांनी केली आहे.

Web Title: Turbhe government colonal drought