४० गावांना गढूळ पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 मार्च 2020

अलिबाग तालुक्‍यातील ४० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या उमटे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. यासाठी फिल्टरेशन प्लान्ट बसवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर हा गाळ काढण्यासाठी तीन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

अलिबाग : अलिबाग तालुक्‍यातील ४० गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या उमटे धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. यासाठी फिल्टरेशन प्लान्ट बसवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर हा गाळ काढण्यासाठी तीन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. गाळ काढल्यानंतर या धरणातून सुरळीत पाणीपुरवठा करणे शक्‍य होईल, असा दावा जिल्हा परिषदेने केला आहे. 

वाचा काय आहे हापूसप्रेमींसाठी गोड बातमी

जिल्हा परिषदेच्या १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा प्रश्न चांगलाच गाजला होता. धरणातून पाणीपुरवठा करणारी जी जलवाहिनी आहे, त्यावर परतीच्या पावसात डोंगराचा भाग कोसळल्यामुळे शुद्धीकरण यंत्रामध्ये बिघाड झाला होता. याचा परिणाम ४० गावांतील नागरिकांना भोगावा लागत आहे. नोव्हेंबरमध्ये उद्‌भवलेल्या या परिस्थितीमुळे जिल्हा परिषदेला तत्काळ नवे शुद्धीकरण यंत्र बसवावे लागले होते. तरीही अद्याप गढूळ पाण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. 

हेही वाचा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिम, नाट्यगृह, चित्रपटगृह, जलतरण तलाव बंद राहणार : मुख्यमंत्री

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आल्याने साठवण क्षमताही कमी झालेली आहे. फिल्टरेशन प्लान्टपर्यंत येणारी जलवाहिनी खराब झाल्याने ती नव्याने टाकण्यासाठी १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पाणी पुरवठा विभागाने धरणातील गाळ काढण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी ३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्या विरोधात येथील नागरिकांना आंदोलनही केले होते. अखेर पाणीपुरवठा विभागाला याची तत्काळ दखल घ्यावी लागली होती. 

फिल्टरेशन प्लान्टची प्रायोगिक तत्त्वावर तपासणी सुरू असताना जलवाहिनी तुटली होती. तिच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. त्याचबरोबर गाळ काढणे आवश्‍यक आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडे मागणी करण्यात आलेली आहे. 
- सुरेंद्र म्हात्रे, विरोधी पक्षनेता, रायगड जिल्हा परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turbid water water supply to 40 villages in Alibaug