esakal | BLOG : असा अतिथी "देवो भव'? 
sakal

बोलून बातमी शोधा

BLOG : असा अतिथी "देवो भव'? 

असुसंस्कृत विधाने करणारी वादग्रस्त व्यक्ती यंदा आपल्या प्रजासत्ताक दिनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तिचे नाव आहे जैर बोल्सोनारो. ते आहेत ब्राझीलचे अध्यक्ष. 

BLOG : असा अतिथी "देवो भव'? 

sakal_logo
By
तुषार सोनवणे

"मी तुझ्यावर बलात्कारही करणार नाही... कारण तू त्या योग्यतेची नाहीस,' असे असभ्य विधान करणाऱ्या व्यक्तीची गणना कोणात केली जाईल? सुसंस्कृत समाजात त्या व्यक्तीचे स्थान काय असेल?... पण अशीच असुसंस्कृत विधाने करणारी वादग्रस्त व्यक्ती यंदा आपल्या प्रजासत्ताक दिनास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तिचे नाव आहे जैर बोल्सोनारो. ते आहेत ब्राझीलचे अध्यक्ष. 

BLOG : चंद्रावर पुन्हा पडणार मानवी पाऊल, भारतीय वंशाचे राजा चारी उत्सुक

दक्षिण अमेरिकेतल्या या देशात दोन वर्षांपूर्वी ते अध्यक्षपदी निवडून आले. तेही मोठ्या बहुमताने. 55 टक्के मते मिळाली त्यांना. आता अशा प्रकारची व्यक्ती एवढे बहुमत घेऊन निवडून कशी येऊ शकते? आपली लोकप्रियता कशी टिकवू शकते? प्रश्‍नच आहे; परंतु हे केवळ ब्राझीलमध्येच घडते असे नव्हे. ते जगातील अनेक देशांत घडत आहे. अशा या नेत्यांत एक साम्य मात्र हटकून दिसते. ते म्हणजे ते सगळे पुराणमतवादी, पुरुषसत्तावादी, सहसा सरंजामशाही मनोवृत्ती असलेले आहेत. जैर हे ब्राझीलच्या लष्करात कॅप्टन होते. नंतर ते राजकारणात आले. तेथेही ते कायम चर्चेत राहिले ते त्यांच्या आक्षेपार्ह, लोकशाही विरोधी, लष्करी हुकूमशाहीवादी वक्तव्यांमुळे! उपरोक्त आक्षेपार्ह विधान त्यांनी केले होते ब्राझीलमधीलच एका महिला नेत्याशी झालेल्या वादात. अर्थात त्यावरून मोठ्या प्रमाणावर संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या. पण जैर हे त्याची पर्वा करणाऱ्यांतील नव्हेत. या प्रकरणानंतर एका तरुणाने चिडून जैर यांना भोसकण्याचा प्रयत्नही केला होता. पण विरोधकांहून जैर यांच्या समर्थकांचे प्रमाण मोठे. आजही त्यांच्या सभांना अफाट गर्दी होत असते. हे असे का, समाज अशा नेत्याच्या मागे का उभा राहतो, हा जेवढा राजकीय तेवढाच समाजशास्त्रीय प्रश्‍न आहे. 

BLOG : सुधारणांमागचे सत्तानाट्य - रशियात सत्तेच्या व्होडकाची बाटली आडवी!

ब्राझीलमध्ये 1964 ते 1984 या दोन दशकांत लष्करी शासन होते. तेथील नागरिकांसाठी सर्वात वेदनादायी काळ होता तो. लष्करी शासनावेळी अत्याचार, हिंसाचार हे नेहमीचेच होते. नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध होते. याकाळात जैर बोल्सोनारो नुकतेच लष्करात दाखल झाले होते. 1984 मध्ये लष्करी शासन कोसळले. लोकशाही आली आणि जैर यांनी काळाची पावले ओळखून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. रिओ दी जानेरिओमधून ते नॅशनल कॉंग्रेसमध्ये खासदार म्हणून निवडून आले. लष्करी हुकूमशाहीबद्दल आत्मियता असलेले जैर हे आतापर्यंत सात वेळा लोकशाही पद्धतीने निवडून आले आहेत. 

BLOG : शिक्षणावर बोलू काही : मंदिर आणि ज्ञानमंदिर

2016 मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या मानवी हत्यांची संख्या ही अमेरिकेपेक्षा सहापट जास्त होती. ब्राझीलच्या शेजारील कोलंबिया, पेरू, बोलिव्हिया आदी देशांत कोकीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घेतले जाते. ब्राझीलमध्ये होणारे बहुतांश गुन्हे हे अमली पदार्थांच्या सेवनामुळे किंवा त्यासंदर्भातील घटनांमुळे होत असतात. देशातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचे ढासळलेले नियोजन, हे त्यामागचे कारण होते. याच काळात तेथे भ्रष्टाचार, लाचखोरी, गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात बोकाळली होती. सगळेच राजकारणी, उद्योजक यांचे हितसंबंध त्या व्यवस्थेतच गुंतलेले होते. जैर यांनी आपण या सगळ्यांपेक्षा कसे वेगळे आहोत, असा प्रचार केला. माजी राष्ट्राध्यक्ष दील्मा रोआऊसेफ यांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी मोठे जनआंदोलन उभे केले. भ्रष्टाचार, लाचखोरी, गुन्हेगारी आदींमुळे ब्राझीलच्या नागरिकांचा न्यायालये, न्याय, कायदा, सुरक्षा सुव्यवस्था, मतदान, निवडणुका या सगळ्यांवरून विश्‍वास उडत चालला होता. या वातावरणात, देशाला गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी हुकूमशाही पद्धतीने प्रशासन राबवण्याची गरज असल्याची भूमिका जैर यांनी घेतली. सार्वजनिकरित्या लष्करी हुकूमशाहीचे समर्थन करणारी विधाने केली. लोक त्यांना "चॅम्पियन ऑफ लॉ अँड ऑर्डर' म्हणू लागले. भ्रष्टाचारी व्यवस्थेविरोधात उभा असलेला सामान्यांचा नेता ही त्यांची प्रतिमा त्यांची ढाल बनली. तिनेच त्यांना यश दिले. लोकशाहीविरोधी, महिलांवरील किंवा कट्टरतावादी पुराणमतवादी आक्षेपार्ह विधानांमुळे त्यांच्यावर होणारे टीकाप्रहार त्यांच्यापर्यंत पोचूच शकले नाहीत. त्यांच्या त्या वागण्यात काही गैर आहे, असे त्यांच्या समर्थकांना वाटतच नव्हते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जैर... एकाला झाकावे आणि दुसऱ्याला काढावे असेच हे नेते. 

BLOG : मानवाची लैंगिक वर्तणूक कशी ठरते

नोव्हेंबर 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 व्या ब्रिक्‍स देशांच्या परिषदेसाठी ब्राझील येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैन बोल्सोनॅरो यांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार जैर भारतीय प्रजासत्ताक दिनी राजपथावर उपस्थित राहणार आहेत. "अतिथी देवो भव' ही आपली संस्कृती; परंतु त्यात असा वादग्रस्त अतिथी बसतो का, हा एक प्रश्‍नच आहे. 

loading image