भिवंडीत दोन कृषी अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना मुद्देमालासह अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

भिवंडी -  भिवंडी तालुक्‍यातील कृषी विभागात शेतकऱ्यांकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय शेतीची कामे होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी यापूर्वीच समोर आल्या आहेत. त्यातच ठेकेदाराने केलेल्या तक्रारीवरून ठाणे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृषी विभागातील तालुका कृषी अधिकाऱ्यासह दोन अधिकाऱ्यांना सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत दोन लाख 40 हजारांची रोकड, एक लाख रुपयांचा धनादेश जप्त करण्यात आला आहे. तालुका कृषी अधिकारी आबासाहेब वाकचौरे (वय 54), कृषी पर्यवेक्षक अधिकारी नवनाथ रावण गरड (49) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण येथील तक्रारदार यांचे भातशेती दुरुस्तीचे 30 लाखांचे बिल काढायचे होते; मात्र त्यांना या बिलासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पाच लाखांची मागणी केली होती. अखेर त्या ठेकेदाराने ठाणे लाचलुचपत विभागाकडे अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. कृषी अधिकाऱ्यांनी तक्रारदाराशी तडजोड करून दोन लाख 40 हजार रुपये रोख आणि एक लाखाचा सही केलेला कोरा चेक देण्याचे ठरवले होते. त्यानुसार सायंकाळी पडघा गावाजवळील ढाब्यावर ठरलेली लाचेची रक्कम घेऊन तक्रारदार ठेकेदार गेला असता ठाणे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गरड आणि वाकचौरे यांना तक्रारदाराकडून दोन लाख 40 हजारांची लाच आणि एक लाखाचा कोरा धनादेश स्वीकारताना अटक केली. याप्रकरणी भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना शनिवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक संजय सादीगले तपास करत आहेत. 

Web Title: Two agricultural officers arrested for accepting bribe