उत्तर प्रदेशमधील पेट्रोलपंप गैरव्यवहारातील दोघे अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

ठाणे - उत्तर प्रदेशातील पेट्रोलपंपांमध्ये सॉफ्टवेअर चिप व रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या दोन आरोपींना ठाणे पोलिसांनी डोंबिवली व पुण्यातून अटक केली आहे.

ठाणे - उत्तर प्रदेशातील पेट्रोलपंपांमध्ये सॉफ्टवेअर चिप व रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या दोन आरोपींना ठाणे पोलिसांनी डोंबिवली व पुण्यातून अटक केली आहे.

सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या दोन आरोपींनी पेट्रोलपंपामध्ये चिप बसवून पेट्रोलच्या मापामध्ये बदल केला होता. या चिपच्या साह्याने 10 ते 20 टक्के पेट्रोल-डिझेल कमी दिले जात होते. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या माहिती आधारे ठाणे पोलिसांनी कारवाई करून विवेक शेट्ये (वय 47) व अविनाश नाईक (37) यांना डोंबिवलीतून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध प्रकारच्या चिप्स व रिमोटसारखे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरात विवेक शेट्ये राहत असून, मायक्रो सीकेटी वर्कशॉपमध्ये कार्यरत आहेत. तेथून ही चिप बनवली जात होती. तर अविनाश नाईक यांची व्हिजिल सिस्टीम कंपनी पुण्यात असून, तेथे रिमोट कंट्रोलचे काम केले जात आहे. त्याची जोडणी तेथे केली जात होती.

ठाण्यातही हेराफेरी
उत्तर प्रदेशातील पेट्रोल पंपामधील गैरव्यवहार उघड झाला असला तरी मुंबई आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्येही अशी हेराफेरी झाली असण्याची शंका पोलिसांना आहे. वैध मापन विभागाच्या मदतीने पोलिसांकडून व्यापक मोहीम राबवली जाण्याची शक्‍यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची ही कारवाई असून आम्ही केवळ त्यांना मदत केली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांचेच आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

Web Title: two arrested in petrol pump scam