एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे वैद्यकीय अहवाल, कोरोनाबाधित रुग्णाचा बळी?

corona maharashtra
corona maharashtra

नवी मुंबई : कोरोना चाचणीकरीता स्वॅब टेस्ट करणाऱ्या खासगी लॅबपैकी थायरोकेअर लॅबला नवी मुंबई पालिकेने नोटीस बजावली आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाचे वेगवेगळे अहवाल दिल्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली. 

लॅबमधून आलेल्या वेगवेगळ्या अहवालामुळे कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यास दिरंगाई झाली. परिणामी त्याचा मृत्यु झाला. याबाबत लॅबवर गुन्हा का दाखल करू नये असे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. वाशीतील एका 70 वर्षीय वृद्धाला त्रास होत असल्यामुळे पीकेसी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. रुग्णालयात भरती केल्यावर 13 मे रोजी त्या रुग्णाचे थायरोकेअर लॅबने कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेतले. त्यानंतर दोन दिवसांनी चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आले; मात्र रुग्णाची प्रकृती खालावत गेल्यामुळे त्यांना जुहू गावातील एका रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर पुन्हा कोरोना चाचणीसाठी थायरोकेअर लॅबने स्वॅब घेतले. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला; मात्र दुसऱ्याच दिवशी रुग्णाची प्रकृती अधिकच गंभीर होऊन त्याचा मृत्यु झाला. 

या प्रकरणी थायरोकेअर लॅबने आधीच व्यवस्थित अहवाल दिला असता तर संबंधित रुग्णावर कोव्हीड-19 विशेष रुग्णालयात उपचार करता आले असते. तसेच त्यांचा जीव वाचवता आला असता; परंतू थायरोकेअर लॅबने एक दिवसाच्या फरकाने केलेल्या चाचणीत चूकीचे अहवाल दिल्यामुळे त्या रुग्णावर कोव्हीड-19 रुग्णालयात उपचार करता आला नसल्याचा ठपका पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ठेवला आहे. तसेच चूकीचे अहवाल दिल्याप्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल का करू नये याबाबत नोटीस ठोठावली आहे. ही नोटीस मिळाल्यापासून 24 तासांच्या आत थायरोकेअर लॅबला पालिकेला स्पष्टीकरण द्यायचे आहे. वेळेवर स्पष्टीकरण न दिल्यास लॅबची परवानगी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असे अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले. 

खासगी लॅबचे उखळ पांढरे
सरकारी लॅबवरील ताण कमी होण्यासाठी राज्य सरकारने खासगी लॅबला कोरोना चाचणी करण्याची परवानगी दिली. मात्र त्याचा लॅब चालकांकडून गैरफायदा घेतला जात आहे. कोरोना चाचणी करण्यासाठी सरकारने 4 हजार 500 रूपये दर निश्चित केला आहे. तरीही काही लॅबकडून स्वॅब घेण्यासाठी नागरीकांच्या घरी जाण्याचा प्रवासी भत्ता म्हणून अधिकचे 500 रूपये आकारले जात आहेत. तसेच काही लॅबमध्ये चाचणी केल्यास चाचणीचे अहवाल पॉझिटीव्हच येतात. परंतू असे पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची पुन्हा सरकारी लॅबमध्ये चाचणी केल्यास तीचा अहवाल निगेटीव्ह येत आहे. त्यामुळे हे लॅब खासगी रुग्णालयांसोबत साटेलोटे करून रुग्णांच्या टाळूवरचे लोणी खाण्याच्या तयारीत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

 Two different medical reports of the same person, the victim of a corona positive are death

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com