कौतुकास्पद! दोन महिन्यात तब्बल 10 हजार नागरिकांची तपासणी करणारा योद्धा; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 23 May 2020

शहरातच्या विक्रोळी येथे राहणाऱ्या डॉ. योगेश भालेराव यांनी या काळात मोठे कौतुकास्पद काम केले आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून डॉ. भालेराव यांनी मुंबईतील विशेषतः झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या परिसरात मेडिकल कॅम्प सुरू केले.

 

मुंबई : शहरामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढणारा हा आकडा प्रशासनाला हतबल करणारा ठरत आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी खासगी दवाखान्यातील डॉक्टरदेखील प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या डॉक्टरांची प्रशासनाला मोठी मदत होत आहे.

कोरोना चाचण्यांच्या नावाखाली 'केडिएमसी'चा व्यवसाय; रुग्णांकडून तीन हजार रुपयांची वसूली

शहरातच्या विक्रोळी येथे राहणाऱ्या डॉ. योगेश भालेराव यांनी या काळात मोठे कौतुकास्पद काम केले आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून डॉ. भालेराव यांनी मुंबईतील विशेषतः झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या परिसरात मेडिकल कॅम्प सुरू केले. या कॅम्पमध्ये नागरिकांच्या तपासणीचे डॉ. भालेराव शुल्क आकारत ऩाही. डॉक्टर भालेरावांनी या दोन महिन्यात दहा हजारापेक्षा जास्त रुग्णांची तपासणी केली आहे. हे विशेष! सध्या लॉकडाउन आणि कोरोना संसर्गाच्या भीतीने खासगी रुग्णालये बंद आहेत. त्यामुळे दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टीपरिसरात कोरोनासोबतच इतर लहानमोठ्या आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. अशा गरजू रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्या उपचारासाठी औषधेसुद्धा देण्यात येत आहेत.

 याबाबत डॉ. भालेराव म्हणतात की,  सध्या प्रशासनावर मोठया प्रमाणात ताण आहे. एकीकडे दररोज कोरोना बाधितांचा वाढत जाणारा आकडा तर दूसरीकडे पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये डॉक्टरांची वाढती संख्या आशा दुहेरी संकटात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी काम करत आहेत. अशा वातावरणात खाजगी दवाखान्यातील डॉक्टर मात्र स्थानिक पातळीवर काम करण्यासाठी नकार देत आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर मी आणि माझ्या पत्नीने चाळीत आणि झोपडपट्टी परिसरात मेडिकल कँप घेण्यासाठी सुरुवात केली आहे. यासाठी काही स्थानिक मित्रांनी देखील हात दिला आहे.

अरे वा! चित्रपटांचे शुटिंगही सुरू होणार? सांस्कृतिक सचिवांना मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

डॉक्टर भालेराव यांनी मुंबईतील अनेक भागांमध्ये मोफत रुग्णसेवा पुरवली आहे. शहरातील विक्रोळी, माटुंगा, ठाणे, मुंब्रा, पुर्व द्रुतगती मार्ग या परिसरातील रुग्णांसाठी डॉ. भालेराव यांनी मोफत रुग्णसेवा पुरवली आहे.  यामध्ये जखम झाली असेल तर त्यावर उपचार करणे, मलमपट्टी करणे, मोफत औषधे देणे, रक्ताची तपासणी करणे, गरज वाटल्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्याची सोय करणे इत्यादी रुग्णसेवा ते करीत आहेत. लॉकडाउनमुळे खासगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे ते सुरळीत चालू होईपर्यंत आपण ही रुग्णसेवा सुरू ठेवणार असल्याचे डॉक्टर भालेराव सांगतात.

डॉ. भालेराव मोफत रुग्णसेवा पुरवीत असले तरी, लॉकडाउनचा परिणाम त्यांच्या कामावर देखील होत आहे. सरकाकडून त्यांना गोळ्या, औषधे उपलब्ध झाली तर, ते जास्तीत जास्त नागरीकांपर्यंत आपली सेवा पोहचवू शकतील. त्यामुळे डॉक्टरांना सरकारी पाठबळाची आवश्यकता आहे. डॉक्टर भालेराव यांच्य़ासोबत प्रिती चव्हाण या कोणतेही मानधन न घेता काम करीत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे पोलिस आणि वैद्यकिय अधिकारी देखील जाण्यास धजावत नाहीत अशा कठीण ठिकाणी डॉक्टर भालेराव देत असलेली रुग्णसेवा कौतुकास्पद आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A warrior who inspected 10,000 civilians in two months; Read detailed