दोन बालिकांवर अवघड शस्त्रक्रिया

दोन बालिकांवर अवघड शस्त्रक्रिया

ऍसिड, ब्लीचिंग पावडरमुळे अन्ननलिका गमवावी लागली
मुंबई - सात रुग्णालये पालथी घातली, सहा लाखांचा खर्च केला आणि तरीही मुलीला अन्न गिळता येईना. उलट अन्ननलिका गमवावी लागली. मोमीन कुटुंबियांनी दीड वर्षे केलेल्या धावपळीनंतर दीड महिन्यांपासून मुलगी तोंडावाटे अन्न घेते यावर ते समाधानी आहेत. ब्लीचिंग पावडर आणि ऍसिड गिळलेल्या दोन मुलींवर लोकमान्य टिळक रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

आई नमाज पढत असताना भिवंडीतील अस्तल्फा मोमीन या बालिकेने ब्लीचिंग पावडर खाल्ली. आईने तिला जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे प्राथमिक उपचार झाले. त्यानंतरही दूध प्यायल्यावर तिला वांती झाल्याने केवळ दीड वर्षांची ही बालिका काहीही खाऊ शकत नव्हती. तिचे वजन कमी झाले. खात्रीलायक उपचार कुठेही मिळाले नाहीत. मोठमोठ्या रुग्णालयांत मोमीन दाम्पत्य मुलीला घेऊन फिरले. परळमधील ग्लोबल रुग्णालयात अस्तल्फावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. तरीही त्रास कमी होत नव्हता.

द्रवपदार्थाशिवाय तिला काहीच खाता येईना. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात त्यानंतर उपचार सुरू झाले. तिची अन्ननलिका खराब झाल्याचे निदान डॉक्‍टरांनी केले. ब्लीचिंग पावडरने पोखरली गेलेली अन्ननलिका काढून टाकण्यात आली. पोटाचा भाग उंचावून त्याची अन्ननलिका तयार करण्यात आली. तिच्या मानेकडचा भाग या अन्ननलिकेला जोडण्यात आला. आता ती जेवू शकते. दोन महिन्यांत तिच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या, असे तिचे वडील सिराज मोमीन यांनी सांगितले.

विरारमधील सय्यद अमिना आरिफ या चार वर्षांच्या मुलीवरही ऑगस्टमध्ये अशीच शस्त्रक्रिया करण्यात आली. अमिना तीन वर्षांची असताना ऍसिड प्यायली होती. लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्‍टरांनी सारे कौशल्य पणाला लावले, असे तिची आई शेनाज आरिफ हिने सांगितले. आता अमिना बोलू शकते आणि तिचे वजनही वाढले आहे. तिला जेवताही येते.

खासगी रुग्णालयाने लुटले
अस्तल्फाला नेमके काय झाले आहे, याचा शोध घेण्यासाठी तिच्या अन्ननलिकेची एका खासगी रुग्णालयाने तब्बल 21 वेळा एण्डोस्कोपी केली. त्यासाठी प्रत्येक वेळी 25 ते 30 हजार रुपये घेतले, असे वडील सिराज मोमीन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com