उकडलेली दोन अंडी तब्बल १७०० रूपयांना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

तारांकित हॉटेलमध्ये एका इंग्रजी लेखकाला दोन उकडलेल्या अंड्याचे तब्बल १७०० रुपये बिलात लावल्याने सर्वत्र चर्चेला उधान आले आहे.

 

मुंबई : मुंबईतील एका तारांकित हॉटेलमध्ये एका ग्राहकाने दोन उकडलेल्या अंड्यांसाठी १७००  रूपये तर एका ऑम्लेटसाठी ८५० रुपये मोजले आहेत. या ग्राहकाने हे बिल ट्विट केले असून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोस याला एका तारांकित हॉटेलमध्ये दोन केळ्यांसाठी ४५० रुपयांचे बिल आले होते. त्यानेही बिल ट्विटवर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. यानंतर आता इंग्रजी लेखक कार्तिक धर यांनाही असेच बिल मिळाले असल्याने त्यांनी बोस यांना टॅग करत बील ट्विटरवर अपलोड केले आहे. यासोबतच "भाई आंदोलन करें क्‍या? " असा प्रश्‍नही त्यांनी राहुल बोसला केला आहे.

दरम्यान कार्तिक यांनी बिल ट्विटवर पोस्ट केल्यानंतर त्यावर असंख्य नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. अंड्यातही सोनं असतं का, असा प्रश्‍न एका ट्विटर वापरकर्त्याने विचारला आहे; तर ही बहुधा श्रीमंतांची कोंबडी असेल, असा चिमटा एकाने काढला आहे.

 जादा शुल्क जीएसटी कायद्यानुसारच - हॉटेलचालक संघटनेचा दावा

पंचतारांकित हॉटेलांमध्ये उकडलेल्या दोन अंड्यांपोटी सतराशे रुपये शुल्क आकारण्यात काहीही अवैध नाही, तसेच अठरा टक्के जीएसटी आकारण्याचे कायदेशीर निर्बंध हॉटेलव्यावसायिकांवर आहेत, असे म्हणणे फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टोरंट असोसिएशन ऑफ इंडिया ने मांडले आहे. तसेच अंड्याच्या बऱ्याच पदार्थांची नावे (उदा. अंडा भुर्जी) मेन्यूकार्डमध्ये नसतात, मात्र त्याचा दर तोच असतो. काही ठिकाणी उकडलेले अंडे, असा पदार्थच हॉटेलांमध्ये नसतो. त्यामुळे असा वेगळा पदार्थ मागितल्यास त्याला अंड्याच्या इतर पदार्थांचा दर आकारला जाईल, असे असोसिएशनचे उपाध्यक्ष गुरुबक्षिशसिंह कोहली यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two eggs for 1700 rupees in five star