छताचा भाग कोसळून दोन जखमी 

छताचा भाग कोसळून दोन जखमी 

नवी मुंबई - नेरूळ येथील मोडकळीस आलेल्या श्री गणेश रहिवाशी सोसायटीच्या इमारतीत छताचे प्लास्टर कोसळून दोन जण जखमी झाले. अवघ्या तीनच दिवसांच्या अंतराने प्लास्टर कोसळण्याच्या घटनेमुळे सोसायटीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पुनर्विकासात अडथळा आणणाऱ्यांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर जयवंत सुतार आणि माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पुनर्विकासासारख्या अतिमहत्त्वाच्या प्रश्‍नात कोणी राजकारण करू नये, असे  आवाहन केले. 

गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास सोसायटीतील ‘गौरीनंदन’ इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील घरात छताचा भाग कोसळला. या दुर्घटनेत हरजितसिंग कौर व त्यांच्या पत्नी सरला कौर हे दोघे जखमी झाले. अचानक अंगावर छताचा भाग कोसळल्याने सरला यांच्या डोक्‍याला जबर मार लागला. त्यांना तात्काळ तेरणा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

रात्री जेवण झाल्यानंतर हरजितसिंग व त्यांची पत्नी दोघेही लहान मुलीसोबत गप्पा मारत बसले होते. त्याच वेळी काही कळायच्या आत डोक्‍यावर छताचा भाग कोसळला. गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या सरला यांनी प्रसंगावधान दाखवत चार वर्षांच्या चिमुरडीला पोटाशी कवटाळत स्वतःच्या अंगावर छताचा भार घेतला. या घटनेत त्यांच्या डोक्‍याला जबर मार लागल्यामुळे त्यांना नजीकच्या तेरणा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हरजित यांच्या डोक्‍याला किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना उपचार झाल्यावर सोडून देण्यात आले.

या प्रकरणी नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसायटीच्या इमारती जुन्या असल्याने अनेक ठिकाणी खांबांना तडे गेले आहेत. भितींना भेगा जाऊन प्लास्टर खिळखिळे झाले आहे. त्यामुळे पालिकेने या इमारतींना अतिधोकादायक घोषित केले आहे. अशा परिस्थितीतही पुनर्विकासाच्या प्रकल्पात खोडा घालणाऱ्या भाजपच्या स्वयंघोषित नेत्यांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. काही नेते मंडळींनी पत्रके वाटून पुनर्विकासाची गरज नसल्याचा पाेकळ दावा केला होता. परंतु दरम्यानच्या काळात घरातील छताचा भाग कोसळल्यामुळे या कथित दाव्याचा भांडाफोड झाल्याची चर्चा रंगली आहे. रहिवाशांची दिशाभूल करून पुनर्विकासाला विरोध करणारे आता कुठे पळाले, अशी टीका सोसायटीचे अध्यक्ष अशोक गावडे यांनी केली. 

‘राजकारण नको’
श्री गणेश सोसायटीतील इमारतीमध्ये छताचा भाग कोसळण्याच्या घटनेची माहिती मिळताच महापौर जयवंत सुतार व माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी घटनास्थळी पाहणी केली. इमारतीला गेलेले तडे व भिंतींना पडलेल्या भेगा पाहिल्या. पुनर्विकासाच्या कामात कोणी राजकारण करू नये, असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. तसेच महापालिकेतर्फे न्यायालयात भक्कम बाजू मांडून ‘श्री गणेश’ला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी प्रतिक्रिया महापौर जयंवत सुतार यांनी व्यक्त केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com