डोंबिवलीत एका रात्रीत दोन ज्वेलर्स दुकाने फोडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jewellers shop broken

डोंबिवली पश्चिमेतील चिंचोड्याचा पाडा परिसरातील दोन ज्वेलर्सची दुकान चोरट्यांनी गुरुवारी पहाटे फोडली.

Dombivali Theft : डोंबिवलीत एका रात्रीत दोन ज्वेलर्स दुकाने फोडली

डोंबिवली - डोंबिवली पश्चिमेतील चिंचोड्याचा पाडा परिसरातील दोन ज्वेलर्सची दुकान चोरट्यांनी गुरुवारी पहाटे फोडली. दुकानाचे शटर उचकटून दुकानातील 13 लाख 65 हजार रुपये किंमतीचे सोने व चांदिचे दागिने चोरून चोरटे पसार झाले आहेत. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरीची घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे. सीसीटिव्ही मध्ये एक चोरटा त्यात दिसून आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

डोंबिवली पश्चिमेतील चिंचोड्याचा परिसरात जबरदास वैष्णव (वय 26) यांचे श्री बालाजी ज्वेलर्स व नारायण रायकर (वय 55) यांचे रायकर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. बुधवारी रात्री 9.30 च्या सुमारास दुकानदार आपली दुकाने बंद करुन गेले होते. मुख्य रस्त्यावर ही ज्वेलर्सची दुकाने आहेत. गुरुवारी पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान एक सराईत चोरटा तेथे आला. त्याने दुकानाचे टाळे तोडले, ग्रीट कट केले असून कटावणीच्या सहाय्याने शटर उचकत दुकानात प्रवेश केला.

बालाजी ज्वेलर्स या दुकानातून सुमारे 7 लाख 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तर रायकल ज्वेलर्स या दुकानातून 6 लाख 35 हजार रुपये किंमतीचे जुने व नविन चांदिचे दागिने असा एकूण 13 लाख 65 हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक राजेंद्र खिलारे हे अधिक तपास करीत आहेत.

चोरीची घटना ही सीसीटिव्ही मध्ये कैद झाली असून त्याआधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. सीसीटिव्ही मध्ये आपली चोरी कैद होऊ नये म्हणून चोरट्याने कॅमेरा फिरवल्याचे देखील या सीसीटिव्ही मध्ये कैद झाले आहे.