अलिबाग-पेण मार्गावरील अपघातामध्ये दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

पळी येथील घटना 

अलिबाग ः अलिबाग-पेण मार्गावर जीप आणि ट्रक यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. यात अन्य एक गंभीर जखमी झाला असून त्याला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

महत्वाची बातमी मोबाईल कॉलिंग 25 टक्क्यांनी महागणार

गणेश श्रीराम कांदू (36, रा. आंग्रेवाडा, अलिबाग) व निखिल नरेंद्र पाटील (22, रा. मुळे, अलिबाग) अशी मृतांची नावे असून जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव वैभव गवई आहे. कांदू यांचा डॉल्बी-स्पीकरचा व्यवसाय आहे. उरण येथील एका कार्यक्रमात स्पीकर लावण्यासाठी तिघेही तेथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उरणकडून (क्र. एम. एच. 6 डी. जी. 3013) पिकअप टेम्पोने अलिबागकडे निघाले असताना पळी येथे शनिवारी (ता. 15) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास समोरून आलेल्या ट्रकची (एम. एच. 06 ए. सी. 6465) आणि त्यांच्या पिकअप टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली.

मोठी बातमी आजपासून तुमचा EMI होणार कमी

या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोयनाडचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना गाडीतून काढून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. उपचारादरम्यान गणेश कांदू व निखिल पाटील यांचा मृत्यू झाला. यातील जखमी वैभव गवई यांच्यावर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहन चालवताना झोप आल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अपघाताची नोंद पोयनाड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Two killed in accident on Alibag-Penh road


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in accident on Alibag-Penh road