खारघरमध्ये कार शोरूमला आग लागून दोघांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 23 एप्रिल 2017

अग्निशमन दलाच्या जवानांनी शिताफीने प्रयत्न करून इमारतीमधील सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. परंतु, शोरूमची सुरक्षाव्यवस्था पाहणाऱ्या दोनजणांना प्राण गमवावे लागले. 

नवी मुंबई : खारघर येथील मारुती सुझुकीच्या शोरूमला आज (रविवार) भीषण आग लागली, त्यामध्ये शोरूमच्या दोन सुरक्षारक्षक मृत्यमुखी पडले. तसेच, शोरूममधील किमान दहा गाड्या जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. 

कृष्ण कुमार आणि जितेंद्र कुमार अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सुरक्षारक्षकांची नावे आहेत. आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज पहाटेच्या सुमारास खारघर सेक्टर क्रमांक दहा येथील आदित्य प्लॅनेट इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली. सायन-पनवेल रस्त्याच्या बाजूला ही इमारत आहे.

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास इमारतीमधून धूर येत असल्याचे काही लोकांनी पाहिले. त्यानंतर पोलिस व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शिताफीने प्रयत्न करून इमारतीमधील सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. परंतु, शोरूमची सुरक्षाव्यवस्था पाहणाऱ्या दोनजणांना प्राण गमवावे लागले. 

Web Title: two people die in fire at maruti showroom at kharghar