
Uddhav Thackeray : चोरांना धडा शिकवणार ; उद्धव ठाकरेंचें शक्तिप्रदर्शन, शिंदेंवर घणाघात!
मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दोन्ही काढून घेतले आहे. एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे हादरलेले उद्धव ठाकरे आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत उद्धव गटाची बैठक होत आहे. आमदार-खासदार मातोश्रीवर पोहोचले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कलानगरच्या गेटवर ओपन जीपमधून कार्यकर्त्यांना संबोधित केले.
महाशिवरात्रीच्या दिवशी आपले धनुष्यबाण चोरीला गेले. ज्यांनी धनुष्यबाण चोरला त्यांनी मधमाश्यांच्या पोळीवर दगड मारला आहे. निवडणुकीच्या तयारीला लागा, गद्दारांना बाळासाहेबांचा चेहरा हवा मात्र ठाकरे कुटुंब नको, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात पुन्हा भगवा फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही. निवडणूक आयोग मोदींचा गुलाम आहे. मी खचलो नाही, खचणार नाही. शिवसेना संपवता येणार नाही.
उद्धव ठाकरेंनी हे रणशिंग फुंगतांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शैली वापरली आहे. १९६९ साली बाळासाहेबांनी कारच्या बोनेटवर उभ राहून भाषण केले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी याच पावलावर पाउलं ठेवत मातोश्री बाहेर हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण पुन्हा एकजुटीने लढू. चोरांचा आणि चोरबाजाराचा नायनाट करू असे म्हणत शिवसेना संपवण्याचा डाव सुरू आहे. मात्र, शिवसेना संपवता येणार नाही. निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. माझ्या हातात काही नाही पण लढाई आता सुरु झाली असल्याचे ते म्हणाले.