esakal | स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्ष सल्ला; म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav thackeray

स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्ष सल्ला; म्हणाले...

sakal_logo
By
अमित उजागरे

राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील एक घटक असलेल्या काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाला महत्वाचा सल्ला दिला आहे. शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना ठाकरे म्हणाले, "स्वबळ हे केवळ एकट्यानं लढणं असं नाही तर अन्यायाविरोधात लढत राहणं म्हणजे स्वबळं होय" (Uddhav Thackeray advice to Congress who raised self reliance Shivsena Anniversary)

हेही वाचा: 'पश्चिम बंगालनं स्वबळ काय असतं ते दाखवून दिलं'; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

ठाकरे म्हणाले, "सध्याचे दिवस कठीण आहेत या काळात अनेक राष्ट्रीय पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत आपणही स्वबळाचा नारा देऊ, पण हा स्वबळाचा नारा म्हणजे काय? स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढण्यापूरतच नाही तर अन्यायाविरोध लढण्यासाठी स्वबळ लागतं. हरल्यानंतरही पराभूत मानसिकता बाळगणं हे घात करतं. पराभूत होऊनही न खचता काम करत राहणं हे स्वबळं आहे."

...तर जनता आपल्याला जोड्यानं मारेल - ठाकरे

राज्यातील कोविड काळातील अस्वस्थता लक्षात न घेता जर आपण केवळ स्वबळाचा नारा देत असू तर लोकं आपल्याला जोड्यानं हाणतील. लोकं म्हणतील की सत्ता आणि स्वबळं ठेव तुझ्याकडे पहिलं मला भाकरी कशी देणार ते सांग. हे न करता तुला आम्ही मतं द्यायची आणि तू तुझं बळ वाढवणार आणि आम्हाला भिकेला लागणार. याचा जर आपण विचार केला नाही तर आपला देश अराजकतेकडेच नव्हे तर अस्वस्थतेकडे चाललेला आहे हे निश्चित. त्यामुळे निवडणुका आणि सत्ता मिळवणं हा विचार सर्व राजकीय पक्षांनी बाजूला ठेऊन. संकटाचा विचार न करता जर आपण विकृत राजकारण करत राहिलो तर मग आपलं आणि आपल्या देशाचं काही खरं नाही.

शिवसेनेचा जन्म कुणाची पालखी वाहण्यासाठी झालेला नाही

प्रत्येकाचे रंग-अंतरंग बघत शिवसेना पुढे चालली आहे. शिवसेनेचीही एक स्वतःची भूमिका आहे. शिवसेना सत्तेसाठी कधीही लाचार होणार नाही, हे आमचं व्रत आहे. पण त्याचबरोबर शिवसेना उगाचचं कोणाचीतरी पालखीही वाहणार नाही. शिवसेनेचा जन्म हा न्यायहक्कासाठी झालेला आहे, दुसऱ्यांच्या पालख्या वाहण्यासाठी नाही, अशा शब्दांत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला लगावला.

आम्ही महाविकास आघाडी केली म्हणजे हिंदुत्व सोडलं हा गैरसमज

अनेकांचा गैरसमज होतो की शिवसेनेनं महाविकास आघाडी केली मग हिंदुत्व सोडलं का? तर हिंदुत्व म्हणजे काय पेटेंट कंपनी नाही. हे माझंच ते गेलं म्हणजे हिंदुत्व सोडलं असं नाहीए. हिंदुत्व हे नेसण्याची आणि सोडण्याची वस्तू नाही, हिंदुत्व आमच्या हृदयात आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे, हा श्वास थांबला तर आमच्या आयुष्याला अर्थ राहणार नाही. आम्ही युती तोडली आघाडी केली म्हणजे हिंदुत्व सोडलं असं होत नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.

स्वबळ हे केवळ निवडणुकांसाठी असता कामा नये

मला आजच्या दिवशी राजकारणावर बोलायचं नाही पण गेल्या काही दिवसांत जे काही घडलंय त्यावर मला बोलावचं लागेल. स्वबळाचा अर्थ केवळ निवडणुका जिंकण नव्हे यासाठी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींचं कौतुक करायला हवं. स्वबळाचा अर्थ केवळ निवडणूका जिंकणं नाही, त्यांनी बंगालची ताकद दाखवून दिली. कोण हारलं आणि कोण जिंकलं हे गौण आहे. अनेक आरोप अंगावर झेलून सुद्धा आपलं मत निर्भिडपणे मांडलं याला स्वबळं म्हणतात.

loading image